छोटा राजनचा सिंगापूरात मृत्यू?

मुंबई पोलिसांना गँगवॉरच्या अनेक प्रकरणात हवा असलेला आणि कुख्यात गुंड दाऊदचा प्रतिस्पर्धी छोटा राजन सिंगापूरमधील रूग्णालयात उपचार सुरू असताना मरण पावला असल्याचे वृत्त आहे. मुंबई पोलिस , आयबी तसेच क्राईम ब्रँचने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिला नसला तरी या विभागातील अधिकार्‍यांकडून मात्र छोटा राजन मरण पावल्याचे सांगितले जात आहे.

१४ वर्षांपूर्वी दाऊदने छोटा राजनवर जीवघेणा हल्ला केला होता तेव्हाच तो गंभीर जखमी झाला होता. त्यावेळी बॅकॉक पोलिसांनी त्याला अटक करून रूग्णालयात दाखल केले होते. राजनला त्यावेळी अनेक गोळ्या लागल्या होत्या. मात्र बॅकॉक पोलिस भारतात त्याला पाठवतील या भीतीने अर्ध्या उपचारातूनच त्याने रूग्णालयाच्या खोलीच्या खिडकीतून उडी मारून पळ काढला होता. मात्र या गोळ्यांमुळे झालेल्या इन्फेक्शनमुळे त्याची मूत्रपिंडे खराब झाली होती आणि गेले कित्येक दिवस तो आजारीच होता.

राजनला पत्नी आणि तीन मुली असून गेले कांही दिवस तो खोल समुद्रातच राहात होता असेही समजते. मात्र तेथेच त्याला छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागल्याने सिंगापूरच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असतानाच जोराचा हृदयविकाराचा झटका येऊन त्यात त्याचा मृत्यू झाला असल्याचे सागितले जात आहे.

मुंबईत ज्योतिर्मय डे या पत्रकाराची हत्या करण्यात छोटा राजनचा हात होता आणि त्याच्या सहाय्यकाने ही हत्या केली होती.