अमेरिकेचे इमेल आणि फोन हेरगिरी प्रकरण उघडकीस आणणारा राष्ट्रीय संरक्षण संस्थेचा कॉन्ट्रॅक्टर एडवर्ड स्नोडेन याची ग्लासगो स्कॉटलंड विद्यापीठात विद्यार्थी रेक्टर पदावर नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीच्या वेळी परंपरेप्रमाणे स्नोडेनने व्हिडीओ लिंकच्या सहाय्याने स्टाफ आणि विद्यार्थ्यांसाठी अॅड्रेस केला असल्याचेही समजते. स्नोडेनवर देशद्रोहाचा आरोप असून त्याला रशियन सरकारने ताप्तुरता आश्रय दिला आहे.
स्नोडेनने आपल्या भाषणात लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या सरकारच्या आपल्यासाठी काय योजना आहेत हे समजून घेण्याचा अधिकार असल्याचे सांगतानाच हीच भूमिका तो रेक्टरपद भूषविताना निभावेल असे सांगितले. ग्लासगो विद्यार्थी प्रतिनिधी कौन्सिलचे अध्यक्ष जेम मॅकग्रेलिस यांनीही स्नोडेने विद्यार्थ्यांना अॅड्रेस करण्याची परंपरा पाळल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या जागेसाठी फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या मतदानात स्नोडेनने ६५६० पैकी ३३४७ मते मिळविली होती. पुढील तीन वर्षे तो या पदावर काम करणार आहे.