गुजरात मॉडेलविरोधात लेख ;पण प्राचार्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा

मुंबई  – निवडणुकीच्या काळात काय घडेल याचा नेम नाही.असाच एक प्रकार मुंबईत घडला आहे, व्यक्तीस्वातंत्र्य असले तरी राजकीय पक्ष कोणती भूमिका घेतात याचा प्रत्यय एका प्राचार्यांना आला आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लेख लिहिला असा आक्षेप घेवून भाजपने प्राचार्यांवर कारवाईची मागणी केली आहे.   

भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी नेहमी आपल्या प्रचारादरम्यान गुजरात मॉडेलचा दाखला देतात. या गुजरात मॉडेलवर टीका करणारा लेख मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी लिहीला आहे. देशातील अग्रगण्य महाविद्यालयांमध्ये मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालय गणले जाते. या महाविद्यालयातील प्राचार्यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. येथील प्राचार्य फादर फ्रेझर मास्करेन्हान्स यांनी ऐन मतदानाच्या आधी गुजरात मॉडेलवर टीका करणारा लेख लिहीला असून तो कॉलेजच्या वेबसाईटवर टाकला आहे. त्यामुळे भाजपचे पित्त खवळले आहे. प्राचार्यांनी लेख लिहिताना अनेक जगदविख्यात लेखक आणि तज्ज्ञांचे दाखले  या लेखात दिले आहेत.

रोजगार हमी योजना आणि अन्न सुरक्षा कायद्याला गुजरातने विरोध केल्याचेही फादर फ्रेझर मास्करेन्हान्स यांनी या लेखात म्हटले आहे. भाजपच्या प्रचाराचा अजेंडा असलेल्या गुजरात मॉडेलवर टीका करताना योग्य निवड करा असे या लेखात म्हटले आहे.याप्रकरणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे प्राचार्य फादर फ्रेझर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.