मुंबई – केन्द्रात सत्ता हस्तगत करण्यास कॉंग्रेसला काही जागा कमी पडल्या आणि यूपीएचे सरकार शक्य होत नाही असे दिसले तर आपण तिसर्या आघाडीत जाऊ असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातून आडवा विस्तव जात नाही. या पार्श्वभूमवर पवारांच्या या विधानाला महत्त्व दिले जात आहे. अर्थात त्यांनी तिसर्या आघाडीत जाण्याची शक्यता फेटाळता येत नसल्याचे म्हटले असले तरी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीए आघाडीचे सरकार नक्की येईल अशीही शक्यता बोलून दाखवली आहेे.
पवारांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपले गोंधळलेले मन उघड केले. तिसरी शक्ती नावाची काही शक्ती आता तरी अस्तित्वात नाही असेही ते म्हणाले आहेत. आपण महाराष्ट्रावर लक्ष केन्द्रित केले असल्याने बाहेरच्या राज्यात गेलो नाही पण २४ एप्रिलला मुंबईतले मतदान झाले की आपण परराज्यात जाणार आहोत असे त्यांनी सांगितले.
देशातल्या माध्यमांनी नरेन्द्र मोदी यांना प्रसिद्धीच्या बाबतीत ढळते माप दिले आहे पण तरीही यूपीएच सत्तेवर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या आघाडीला मित्रपक्षही मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नरेन्द्र मोदी यांना मात्र मित्रपक्ष मिळणार नाहीत असे ते म्हणाले.