कुठेही, कधीही वायरशिवाय करा मोबाईल चार्ज

वायरलेस तंत्रज्ञान संशोधनात संशोधकांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले असून आता वायफाय झोन प्रमाणेच जागोजागी वाय पॉवर झोन निर्माण करण्यात येणार आहेत. यामुळे स्मार्टफोन तसेच चार्जिंगची आवश्यकता असलेली अन्य इलेक्ट्रोनिक उपकरणे पाच मीटर अंतरावरूनही चार्ज करता येणे शक्य झाले आहे.

दक्षिण कोरियाच्या अॅडव्हान्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स टेक मधील प्रो. चून टी रीम यांनी वायरलेस पॉवर ट्रान्स्फरचे हे तंत्रज्ञान विकसित केले असून त्याला डिपोल कॉईल रेझोनंट सिस्टीम असे नांव दिले आहे. यामुळे एखादे रेस्टॉरंट, रस्ता अशा ठिकाणी वाय पॉवर झोन निर्माण करता येणार आहे आणि पाच मीटर अंतरावरूनही एकाचवेळी ४० स्मार्टफोन चार्ज होऊ शकणार आहेत. अर्थातच त्याच्यासाठी इलेक्ट्रीक वायरची गरज राहणार नाही.

यासाठी कॉम्पॅक्ट फेराईट कोअर रोड तयार करून त्याच्यामधोमध वायंडिग करून उच्च दाबाचा एसी करंट निर्माण केला जातो. यातून मॅग्नेटिक फिल्ड तयार होते व त्यातून व्होल्टेज निर्मिती केली जाते असे समजते.