अजित पवार यांची नार्को टेस्ट करा

बारामती – गावकर्‍यांना धमकी देणार्‍या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी बारामती मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. या प्रकरणी पोलिसांनी पवारांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. मात्र राज्याचे पोलीस खाते राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात असल्याने या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही जानकर यांनी केली.

मतदानाच्या पूर्वसंध्येला अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील मासाळवाडी या टंचाईग्रस्त गावात जाऊन गावकर्‍यांना मतदानासाठी धमकी दिल्याचे एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर आहे. बारामतीतील आम आदमी पक्षाचे उमेदवार व निवृत्ती आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पवारांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पोलीस खाते पुरावे नष्ट करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप महादेव जानकर यांनी केला आहे.

मतदारांवर दमदाटी करून दबाव टाकणार्‍यांवर कारवाई न केल्यास आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. या धमकीप्रकरणी दिल्लीपर्यंत दाद मागणार असल्याचेही जानकर म्हणाले. उपमुख्यमंत्री पवारांना पाणीप्रश्‍नी जाब विचारल्याच्या कारणावरून मुर्टी (ता. बारामती) या टंचाईग्रस्त गावातील उमेश जगदाळे या युवकालादेखील मतदानाच्या पूर्वसंध्येला स्थानिक पोलीस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळपासून रात्री ११ पर्यंत ताब्यात ठेवून त्याला मारझोड केल्याचा आरोप कॉंग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी केला आहे. दुष्काळी भागातील जनता पवारांच्या प्रचंड दहशतीखाली असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Comment