
विश्वचषकापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत नसीम शाह याच्यासाठी विश्वचषक खेळणे अवघड असल्याचे वृत्त होते, परंतु आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक याने स्पष्टपणे सांगितले आहे की, तो विश्वचषक खेळू शकणार नाही, कारण डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्यास सांगितले असून तो सहा ते आठ महिने क्रिकेट खेळू शकणार नाही. नसीम नुकताच आशिया कप-2023 मध्ये जखमी झाला होता. तेव्हापासून तो विश्वचषक खेळणार हे निश्चित नव्हते. आता एका शोमध्ये बोलत असताना इंझमामने स्पष्ट केले आहे की, नसीम विश्वचषकासाठी 15 खेळाडूंच्या संघात नसेल. पीसीबी आज आपला विश्वचषकासाठीचा अंतिम संघ जाहीर करणार आहे.
विश्वचषक संघ जाहीर होण्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, हा गोलंदाज 6-8 महिने बाहेर
आशिया चषक स्पर्धेत भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सुपर-4 सामन्यात नसीम शाहच्या खांद्याला दुखापत झाली होती. याच कारणामुळे तो 49 वे षटक पूर्ण न करताच बाहेर गेला. तेव्हापासून त्याच्या दुखापतीबाबत अनेक अटकळ बांधल्या जात होत्या, ज्याला इंझमामने पुर्णविराम दिला आहे. नसीम शाहसारख्या वेगवान गोलंदाजाला वगळणे हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे.
Update On Naseem Shah pic.twitter.com/kCV9UScF5n
— Hayat Sikandar (@NH61348064) September 21, 2023
नसीमला दुखापत झाल्यापासून त्याच्या विश्वचषक खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती आणि तेव्हापासून त्याच्या बदलीची चर्चा आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हसन अली विश्वचषक संघात नसीमच्या जागी प्रबळ दावेदार आहे. हसन अलीने पाकिस्तानसाठी 60 एकदिवसीय सामने खेळले असून एकूण 91 बळी घेतले आहेत. त्याने 12 जून 2022 रोजी मुल्तानमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पाकिस्तानसाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. हसन अलीची गणना सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये केली जाते. मुख्य निवडकर्ता इंझमाम याने शुक्रवारी संघाची घोषणा केली आणि त्यात हसन अलीचे नाव आले, तर आश्चर्य वाटायला नको.
इंझमामपूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनेही नसीम विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले होते. आता तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. नसीमशिवाय आशिया चषकात हरिस रौफलाही दुखापत झाली होती. भारताविरुद्धच्या सामन्यातही त्याला ही दुखापत झाली होती. रौफबद्दल पाकिस्तानी मीडियावर विश्वास ठेवला, तर तो तंदुरुस्त आणि विश्वचषक खेळण्यासाठी तयार आहे. बाबरने आशिया चषकानंतरही सांगितले होते की, विश्वचषकापर्यंत रौफ फिट असेल. पाकिस्तानने 1992 पासून एकदिवसीय विश्वचषक जिंकलेला नाही.
