Akhil Mishra Death: किचनमध्ये काम करताना टेबलावरून पडून थ्री इडियट्सच्या ‘लायब्रेरियन दुबे’ यांचा मृत्यु


आमिर खानसोबत ‘थ्री इडियट्स’ चित्रपटात काम करणारे अभिनेते अखिल मिश्रा यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अखिल मिश्रा हैदराबादमध्ये शूटिंग करत होते. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल मिश्रा त्यांच्या घरातील किचनमध्ये टेबलावर चढून काही काम करत होते. यादरम्यान ते टेबलावरून पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांचे बरेच रक्त वाया गेले. रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अखिल मिश्रा यांनी अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. या अभिनेत्याच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

थ्री इडियट्स या चित्रपटात अखिल मिश्राने लायब्रेरियन दुबे यांची भूमिका साकारली होती. आमिर खानच्या या चित्रपटात दुबे जीची भूमिका खूपच मनोरंजक होती. याशिवाय उत्तरन या मालिकेत त्यांनी उमेद सिंग बुडेलाची भूमिका साकारली होती, जी लोकांना खूप आवडली होती. अखिल मिश्राने सीआयडी, श्रीमान श्रीमती, भंवर, उडान, भारत एक खोज आणि रजनी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

अखिल मिश्रा, ज्यांनी डॉन अब्बा आणि हजारों ख्वाहिशे ऐसीमध्ये भूमिका केल्या, ते एक अनुभवी अभिनेते होते. त्यांची पत्नी सुझान बर्नेट ही जर्मनीची आहे. पतीच्या आकस्मिक निधनामुळे अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अखिल मिश्रा यांनी दोनदा लग्न केले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मंजू मिश्रा होते, जिच्यापासून त्यांचा घटस्फोट झाला होता. यानंतर 2009 मध्ये अखिल मिश्रा यांनी जर्मन अभिनेत्री सुझानशी लग्न केले. सुझानने कसौटी जिंदगी की, ये रिश्ता क्या कहलाता है आणि सावधान इंडियामध्ये काम केले आहे.

अखिल मिश्रा यांचे हिंदी भाषेवर चांगले प्रभुत्व होते. त्यांनी पत्नीला हिंदी आणि अभिनयाचे कौशल्य शिकवले. अखिल मिश्राही अभिनय प्रशिक्षक म्हणून काम पाहत असे. ‘मजनू की ज्युलिएट’ या लघुपटात त्यांनी केवळ अभिनयच केला नाही, तर त्याची कथाही लिहिली. आज अभिनेत्याने जगाचा अशा प्रकारे निरोप घेतल्याने त्यांचे चाहते दु:खी झाले आहेत.