नांदेड: उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री होण्यासाठी गुडध्याला बांशिंग बाधून तयार आहेत. मात्र त्यांना त्यासाठी आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणूकीची वाट पहावी लागणार आहे, असे असले तरी आगामी काळात अजित पवार काँग्रेसचे मुख्यमंत्री होतील असे वक्तव्य करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी खळबळ माजवली आहे.
नांदेडमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे याना त्याकारणाने जमत नाही. यापूर्वी अनेकवेळा अजित पवारांनी जाहीरपणे माणिकराव ठाकरेंवर टीकेची झोडही उठवली. असे असताना माणिकराव ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर का स्तुती सुमने उधळली हे गुलदस्तयात आहे. या लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रामाणिकपणे आघाडी धर्म पाळत असल्याचे प्रशस्तीपत्रक यावेळी त्यांनी दिले आहे.
आता माणिकराव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर आघाडीमध्ये कलगीतुरी रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे यांच्या या वक्तवव्यानंतर आता भविष्यात अजित पवार काँग्रेसमध्ये जाणार की काँग्रेस त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी बिनशर्त पाठिंबा देणार अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. आता अजीत पवार या वक्तव्याला कशाप्रकारे उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.