मोदी व गांधी सडलेले मॉडेल : योगेंद्र यादव

पिंपरी – काँग्रेसचे राहूल गांधी घराणेशाहीचे प्रतिनिधित्व करतात तर भाजपचे नरेंद्र मोदी हे हुकूमशहा आहेत. विकासाच्या नावावर हे दोन्ही सडलेले मॉडेल पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्यात आले आहेत. मतदारांवर लादण्यात येत हे दोन्ही पर्याय लोकशाहीसाठी घातक बाब असल्याचा घाणाघात आपचे राष्ट्रीय नेते योगेंद्र यादव यांनी आज (शनिवारी) चिंचवड केला. देशात मोदींची लाट असेल तर ते दोन मतदार संघातून निवडणूक का लढवत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मावळ लोकसभा मतदार संघातील आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार मारुती भापकर यांच्या प्रचारार्थ योगेंद्र यादव यांची सभा झाली. शिरुर लोकसभा मतदार संघातील उमेदवार सोपान निकम, आपच्या जिल्हा सचिव आभा मुळे, अरुणा दास, लोकसंघर्ष जनमोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे, श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकळे, विश्व कल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार, नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, युसूफ पठाण, रियाझ पठाण आदी उपस्थित होते.

यावेळी योगेंद्र यादव म्हणाले की, यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशाचे भावी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी विरुध्द राहूल गांधी असे चित्र उभे केले जात आहे.  विकासाच्या नावावर दोन्ही सडलेले मॉडेल मतदारांवर अक्षरशः लादले जात आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतील लोकशाहीसाठी ही घातक बाब आहे.  घराणेशाहीला वाहिलेल्या पक्षांनी शरद पवार अँड फॅमिली, ठाकरे अँड सन्स, मुलायम सिंग अँड सन्स, लालू अँड सन्स तर काँग्रेसने गांधी-नेहरु सन्स, सन्स इन लॉ, असे आपल्या पक्षाचे नाव ठेवावे, अशा शब्दात यादव यांनी घराणेशाहीची खिल्ली उडविली. राष्ट्रीय स्तरावर दिसून येत नसले तरी स्थानिक पातळीवर भाजपमध्येही घराणेशाही असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

काँग्रेस स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणते. मात्र, त्यांनी अल्पसंख्याकांना मतांच्या राजकारणासाठी ओलीस ठेवले आहे. भाजपची धोरणे तर भारताच्या मूलतत्वांच्या विरोधात आहेत. काँग्रेस व भाजपकडून आता भ्रष्टाचारमुक्तीच्या घोषणा केल्या जात आहेत. मात्र या दोन्ही पक्षांचे मूळ भ्रष्ट आहे. भाजपमध्येच लोकशाहीचा अभाव आहे. ते देशातील लोकशाही कशी टिकविणार, असा सवालही त्यांनी केला. देशाला सत्ता बदल नको आहे; तर चांगला पर्याय हवा आहे. हा पर्याय आपच्या माध्यमातून उपलब्ध झाला असल्याचे योगेंद्र यादव यांनी नमूद केले.सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना योगेंद्र यादव म्हणाले, पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राकडून आपला अनेक अपेक्षा आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रामध्येही आप सत्ताबदल घडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोदी लाटेच्या चर्चेविषयी बोलताना ते म्हणाले, देशात अशी कुठलीही लाट नाही. मोदी यांची लाट असेल तर त्यांनी दोन मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय का घेतला. 

एका ठिकाणाहून लढण्याचा विश्वास त्यांच्यात नव्हता का, असा सवालही त्यांनी केला. आप राजकारणातून संपेल, असे भाकीत केले जात आहे. आम्हाला इतर राजकीय पक्षांप्रमाणे कुरघोडीचे राजकारण, छक्के-पंजे करता येत नाहीत. आमच्याकडून काही चुका होत असतील. मात्र, आप हा सर्वसामान्य माणसांचा पक्ष आहे. आमच्या विचारांमध्ये प्रामाणिकपणा आहे. त्यामुळे आप कधीही संपू शकत नाही, असा दावा त्यांनी केला. –