गुर्‍हाळ चालविणार्‍या महिलेवर लष्करी जवानाचा बलात्कार

पुणे : रस्त्यावर उसाचे गुर्‍हाळ चालविणार्‍या महिलेला रसाची मागणी करून तिच्यावर लष्करातील जवानाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एम्प्रेस गार्डन येथील लष्काराच्या नर्सरीच्या तंबूत या जवानाने तिला धमकावून परवा दुपारी बलात्कार केला. त्यानंतर तिच्या पतीला मारहाण केली.मधुकर राम देडे (वय-41, सध्या रा. सब एरिया, 101 बटालियन स्टाफ, अर्जुन मार्ग, रेसकोर्सजवळ, घोरपडी. मूळ रा.जळकोटवाडी, ता.तुळजापुर, धाराशिव) असे अटक केलेल्या जवानाचे नाव आहे. पीडीत महिलेने या संदर्भात वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे; अशी माहिती वानवडीचे सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल गौड यांनी दिली.ही महिला आणि तिचा पती मूळचे नगर जिल्ह्यातील आहेत.

दरवर्षी ते उन्हाळ्यात त्यांच्या मूळ गावावरून गुर्‍हाळ चालविण्यासाठी पुण्यात येतात. रस्त्याच्याकडेला लाकडी चरक लावून त्याच्यावर ते रस काढतात. आरोपी मधुकर देडे हा मराठा बटालियनमध्ये हवालदार आहे. तो सध्या लष्कराच्या सब एरिया डिव्हीजनमध्ये नियुक्तीस आहे. सब एरियाच्या विविध आस्थापनांना रोप, मातीचा, शोभीवंत झाडांचा नर्सरीतून पुरवठा केला जातो. एम्प्रेस गार्डन जवळील लष्कराच्या सब एरियाच्या जागेत नर्सरी आहे. परवा (दि.6) दुपारी साडेतीनच्या सुमारास हवालदार देडे याने महिलेला दोन ग्लास उसाचा रस घेऊन तंबूत बोलवले. धमकावून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर घाबरलेली महिला तंबूतून पळाली. तिने पतीला या प्रकाराची माहिती दिली.

यानंतर पती नर्सरीत गेला तेव्हा हवालदार देडे यांने पतीला मारहाण केली. तुम्हाला येथे राहून देणार नाही. अशी धमकी दिली. महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर वानवडीचे सहाय्यक निरिक्षक राहुल गौड यांनी सब एरियाच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांना या घटनेची माहिती दिली. त्याला आज अटक करण्यात
आली. सहाय्यक निरिक्षक राहुल गौड तपास करीत आहेत.