निर्ढावलेल्या संस्थाचालकांना पालकांनी दिला चोप चिमुरडीवर अत्याचार करणा-या कर्मचा-यावर कारवाईस टाळाटाळ

पुणे – स्कूलबसमध्ये चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल तक्रार करून संबंधित कर्मचा-यावर कारवाई करण्याइऐवजी निर्ढावलेपणाने त्याला कामावर कायम ठेवल्याबद्दल संतापलेल्या पालकांनी संबंधित कर्मचा-यासह संस्थाचालकांनाही चोप दिला. संतप्त पालकांनी शाळेत तोडफोडही केली आहे. सिंहगड रस्त्यावर असलेल्या स्प्रिंग डेलच्या स्कूल बसमधील विद्यार्थी सहाय्यकाने चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने आपल्या पालकांना सांगितला. त्यानुसार पालकांनी संस्थाचालकांकडे तक्रारही केली. त्या कर्मचा-यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीला संस्थाचालकांकडून सकारात्मक प्रतिसादही मिळा.

मात्र सोमवारी पुन्हा हाच कर्मचारी स्कूल बसमध्ये असल्याचे आढळून आल्याने या पीडीत मुलीच्या पालकांनी आणि त्या ठिकाणी उपस्थित पालकांनी बस चालक आनि सहाय्यक यांची पिटाई केली. त्यानंतर या जमावाने शाळेकडे धाव घेऊन शाळेतील सामानाची तोडफोड केली. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थाचालक मारुती नवले यांनी जमावाची समजूत काढण्याची प्रयत्न करताच ते देखील या संतप्त पालकांच्या तडाख्यातून सुटले नाहीत. त्यांनाही जमावाने इंगा दाखविला. याचवेळी घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी जमावाला शांत रहाण्याचे आवाहन केले. त्यावर पालकांनी बस चालक आणि सहाय्यक यांना अटक करण्याची आग्रही मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. मात्र संस्थाचालक या दोषी कर्मचा-यांची पाठराखण करीत असल्याबाबत पालकांचा रोष कायम आहे.