भाजपाच्या मुकुटात शिरपेच

भारतीय जनता पार्टीने आंध्र प्रदेशामध्ये म्हणजे आंध्र प्रदेशाच्या दोन्ही भागामध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलुगु देसम पक्षाशी युती केली असून २७२ चा जादुई आकडा गाठण्याच्या दिशेने आणखी एक निर्णायक पाऊल टाकले आहे. गेल्या आठवड्यात विविध संस्थांनी सर्वेक्षणे प्रसिद्ध केली. त्या सर्वेक्षणांमध्ये भारतीय जनता पार्टीला २४० च्या आसपास जागा मिळतील असे अंदाज व्यक्त झाले होते, पण ते अंदाज निघाले तेव्हा भाजपाची तेलुगु देसमशी युती झालेली नव्हती. आता ती झाली आहे आणि चित्र पुन्हा बदलले आहे. या युतीने भाजपाला आणि त्यांच्या मित्रपक्षाला मिळून २७२ जागा मिळण्याची शक्यता वाढली आहे. तेलुगु देसम पक्ष गेली दहा वर्षे भाजपापासून दूर गेला होता, आता तो पुन्हा जवळ आला आहे. कालच भाजपाच्या दिशेने एक सकारात्मक संकेत मिळाला. तमिळनाडूमध्ये करुणानिधी यांचे चिरंजीव अलागिरी यांनी प्रथमच उघडपणे भाजपाला पाठींबा जाहीर केला. भारतीय जनता पार्टी दक्षिण आणि पूर्व भारतामध्ये मोठा प्रभाव राखून नाही असे म्हटले जाते आणि भाजपाचे नेते या भागांमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यादृष्टीने हे दोन संकेत मोठे महत्वाचे आहेत. 

आंध्र प्रदेशातून लोकसभेवर ४२ खासदार निवडले जातात तर तमिळनाडूमधून ३९ सदस्य लोकसभेवर जातात. या दोन मोठ्या राज्यात त्यातल्या त्यात आंध्र प्रदेशात भाजपाला मिळालेली तेलुगु देसमची कुमक मोठीच लाभदायक ठरणारी आहे. या निमित्ताने भाजपाचे बिछडे हुए मित्रपक्ष जवळ येत आहेत आणि भाजपा कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास वाढत आहे. २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीचे बरेच मित्र त्याच्यापासून दूर गेले होते. केवळ शिवसेना आणि अकाली दल हे प्रदीर्घकाळपासूनचे मित्रपक्ष भाजपाच्या जवळ राहिले होते. मात्र लोकसभा निवडणुकीची हवा भाजपाच्या बाजूने वहात असल्याचे लक्षात येताच भाजपाचे काही जुने मित्रपक्ष जवळ यायला लागले आहेत. रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पार्टी हा पक्ष भाजपाच्या आघाडीत दाखल झाला. महाराष्ट्रात रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपाइं याही पक्षाची साथ भाजपाला मिळाली. त्यापाठोपाठ तमिळनाडूत भाजपाने पाच पक्षांंची आघाडी केली. १९९८ साली भारतीय जनता पार्टीला सत्तेवर येण्यास दक्षिणेचा मोठा पाठींबा होता. तसा तो आता पुन्हा मिळायला लागला आहे. त्यावेळी जयललिता वाजपेयींच्या मागे आपल्या २७ खासदारांसह उभ्या होत्या.

कर्नाटकात रामकृष्ण हेगडे यांच्या प्रभावामुळे भाजपाचे १७ खासदार निवडून आले होते आणि आंध्र प्रदेशातून तेलुगु देसम पक्षाचे ३४ खासदार भाजपाच्या मागे बाहेरचा पाठींबा म्हणून उभे होते. एकंदरीत ७० ते ७२ खासदारांची ताकद दक्षिणेतून उभी होती. मात्र २००२ च्या गुजरात दंगलीपासून हे पक्ष दूर जायला लागले. वाजपेयी सरकार सत्तेवर असतानाच रामविलास पासवान दूर गेले, मतता बॅनर्जी यांनी युती मोडली. त्यामुळे २००४ साली राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडी किंवा एन.डी.ए. या बॅनरखाली निवडणुका लढवल्या गेल्या नाहीत. १९९८ साली सुद्धा भाजपाचे सगळे मित्रपक्ष एकत्र लढले नव्हते. भाजपाने काही मित्रांसह निवडणूक लढवली होती आणि काही मित्रांनी सत्तेवर येण्यासाठी पाठींबा दिला होता. २००४ सालच्या निवडणुकीत मात्र आपण भाजपासोबत राहिलो तर मुस्लीम मतदार आपल्यापासून दूर जातील अशी भीती त्यांना वाटायला लागली आणि त्या निवडणुकीत शिवसेना आणि अकाली दल या दोन पक्षांच्या मदतीने भाजपाने लढत दिली. परिणामी सत्ता गेली. २००९ पर्यंत ही परिस्थिती अशीच होती. पण आता कॉंग्रेसचे घटते बळ आणि मोदींची लाट यामुळे चित्र पार बदलून गेले आहे. रामविलास पासवान, चंद्राबाबू नायडू, एम.के. अलागिरी, रामदास आठवले हे केवळ मागेच उभे राहिले आहेत असे नाही तर भाजपासोबत निवडणूक लढवत आहेत. 

या गोष्टीचा विचार केला असता आताची भाजपाची स्थिती १९९८ पेक्षा वेगळी आहे. किंबहुना नेमकेपणाने सांगायचे तर १९९८ पेक्षा मजबूत आहे. रामविलास पासवान यांच्यामुळे आणि अपना दल या पक्षामुळे भाजपाचे बिहार आणि उत्तर प्रदेशातले बळ वाढले आहे. आंध्र प्रदेश, तमिळनाडू याही दोन मोठ्या राज्यांमध्ये भाजपाला त्या त्या भागातले प्रभावी मित्र मिळाले आहेत. आंध्रात काल तेलुगु देसम आणि भाजपा यांची युती जाहीर झाली. खरे म्हणजे तेलुगु देसम हा पक्ष आंध्र प्रदेशात कोणाचीही युती न करता स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळविण्याच्या क्षमतेचा आहे. १९८३, १९८५ आणि नंतर १९९५, २००२ या निवडणुकांमध्ये तेलुगु देसमने स्वत:चे हे बळ दाखवून दिले आहे. अलीकडच्या काळात तेलंगण निर्मितीच्या निमित्ताने ज्या राजकीय उलथापालथी झाल्या त्यांच्या पार्श्‍वभूमीवर या दोन्ही राज्यांमध्ये आपले बळ नेमके किती राहील याबाबत तेलुगु देसमच्या नेत्यांच्या मनात शंका आहे. परंतु कॉंग्रेस पक्षाचे खच्चीकरण झाल्यामुळे तेलुगु देसमला चांगली संधी आहे. केवळ तशी खात्री नाही म्हणून पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू काहीसे संभ्रमात आहेत. त्यामुळे थोड्याशा संभ्रमाच्या वातावरणात का होईना पण तेलुगु देसमचा आत्मविश्‍वास भाजपाशी मैत्री केल्यामुळे वाढायला लागणार आहे.

Leave a Comment