एक्सरेच्या सहाय्याने शोधता येणार भूगर्भातील हिरे

लंडन – जर्मन संशोधकांनी युनिक एक्सरे तंत्रज्ञान विकसित केले असून त्यामुळे खडकात खोलवर रूतलेले हिरे शोधण्यास मदत मिळते. याचा सर्वाधिक फायदा डायमंड हंटरना म्हणजे हिर्‍याच्या शोधात असलेल्या हिरेपारख्यांना होणार आहे.

पृथ्वीच्या पोटात खोलवर असलेल्या किंबरलाईट खडकांत हिरे दडलेले असतात. मात्र ते शोधण्यासाठी हे खडक फोडावे लागतात. त्यासाठी उर्जा, खर्च, वेळ वाया जातो शिवाय हिरे सापडतीलच अशी खात्री देता येत नाही. नवीन एक्सरे तंत्रज्ञानामुळे खडकात हिरे आहेत वा नाहीत हे आधीच समजू शकणार आहे.

या तंत्रज्ञानात एकाच वस्तूच्या दोन प्रतिमा घेतल्या जातात. त्यासाठी वेगळे एक्सरे वापरले जातात. विशेष पद्धतीने तयार केलेल्या अल्गोरिदमच्या सहाय्याने दोन्ही इमेजेसचा डेटा फिल्टर केला जातो. त्यामुळे किंबरलाईट खडकांत हिरा असेल तर तो वेगळा दाखविला जातो. दोन इंची हिर्‍यापासून कितीही मोठ्या साईजचा हिरा या तंत्रज्ञानाने लोकेट करता येतो असा संशोधकांचा दावा आहे.