श्रीहरिकोटा – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने देशाच्या दुस-या दिशादर्शक उपग्रहाचे शुक्रवारी यशस्वी प्रक्षेपण केले. पीएसएलव्हीसी२४च्या सहाय्याने आयआरएनएसएस-१बी या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून पाच वाजून १४ मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर १९ मिनिटांनी पीएसएलव्हीने उपग्रह यशस्वीपणे अंतराळात पोहचवला.
पीएसएलव्हीचे हे सलग २५वे यशस्वी उड्डाण असल्याचे इस्त्रोचे अध्यक्ष के.राधाकृष्णन यांनी सांगितले. ‘मी संपूर्ण इस्त्रो संघाचे अभिनंदन करतो. पीएसएलव्ही क्षेपणास्त्राच्या यशस्वी उड्डाणामुळे करुन अंतराळशास्त्रात भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकले,’ असे इस्त्रोचे प्रमुख के. राधाकृष्णन म्हणाले. भारताच्या या दुस-या दिशादर्शक उपग्रहाचे वजन एक हजार ४३२ किलो इतके आहे. भारताच्या प्रादेशीक दिशादर्शक उपग्रह यंत्रणासाठी(आयआरएनएसएस) हा उपग्रह काम करणार आहे. या मोहिमेसाठी इस्त्रोला एक हजार ४२० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. भारताची ‘आयआरएनएसएस’ ही प्रणाली अमेरिकेच्या जीपीएसला समानंतर आहे.