भारत टी-२०च्या अंतिम फेरीत

मिरपूर- आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य लढतीतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून विजय मिळवत भारताने  अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताकडून विराट कोहलीने नाबाद ७२ धावा केल्या.  कोहलीच्या या खेळीत दोन षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. भारताकडून अजिंक्य रहाणेने ३२, रोहित शर्माने २४ धावा केल्या. त्याआधी दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजीकरत चार बाद १७२ धावा केल्या होत्या. 

सलामीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर फाफ डु प्लेसिस याने केलेल्या ५८ धावांच्या जोरावर आफ्रिकेला १७२पर्यंत मजल मारता आली. भारताकडून आर.आश्वीनने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आणि तीन गडी बाद केले. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीकरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांना चांगली सुरुवात करता आली नाही. सलामीवीर क्विंटन डी कॉक केवळ सहा धावांवर बाद झाला. त्याला भुवनेश्वर कुमारने बाद केले. त्यानंतर हशिम अमला याला २२ धावांवर अश्विनने बाद केले. 

आघाडीचे दोन्ही फलंदाज बाद झाले तेव्हा आफ्रिकेची अवस्था दोन बाद ४४ अशी होती. त्यानंतर मात्र प्लेसिस आणि जेपी दुमिनी यांनी तिस-या विकेटसाठी ७१ धावांची भागिदारी करत आफ्रिकेचा डाव सावरला. प्लेसिस ५८ धावांवर बाद झाला. त्याला अश्विनने बाद केले. त्यानंतर एबी डेविलियर्सला दहा धावांवर अश्विननेच बाद केले. दुमिनी ४५ धावांवर नाबाद राहीला. भारताकडून अश्विनने तीन तर भुवनेश्वर कुमार याने एक गडी बाद केला.

Leave a Comment