महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरुन ९९ लाखांची रोकड जप्त

कोल्हापूर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना भुलवण्यासाठी पैशांच्या गैरव्यवहाराला सुरुवात झाली आहे. देशाच्या वेगवेगळया भागातून मोठया प्रमाणावर बेहिशोबी रोकड आणि मद्य जप्त करण्यात येत आहे. गुरुवारी रात्री महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर एक गाडीतून ९९ लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. कर्नाटकातून कोल्हापूरच्या दिशेने ही गाडी येत होती. 

कर्नाटकातील आप्पाची वाडी येथील चेकपोस्टवर गाडीची तपासणी करताना त्याता बेहिशोबी ९९ लाखांची रोकड सापडली. या गाडीतून चौघेजण प्रवास करत होते. निपाणी पोलिसांनी गाडी आणि रक्कम ताब्यात घेतली असून, चौघांची कसून चौकशी सुरु केली आहे. दक्षिणेकडील राज्य असलेल्या आंध्रप्रदेशातून आतापर्यंत सोळा कोटींच्या वर रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाची स्वत:ची गुप्तचरयंत्रणा कार्यरत आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाच्या दुष्टीने काही संवदेनशील राज्ये ठरवली आहेत. त्यामुळे तेथील प्रचार खर्चावर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष आहे.