मोदी विकासपुरुष नव्हे विनाशपुरुष!- नारायण राणे

वर्धा – ‘खोटे बोल पण रेटून बोल, या म्हणीला समर्पक उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी. मोदींनी गुजरातच्या विकासाचा खोटा देखावा उभा केला. परंतु मोदी हे विकासपुरुष नाहीत, तर विनाशपुरुष आहेत, असे त्यांच्याच पक्षातील लोक आता बोलू लागले आहेत,’ असा टोला उद्योगमंत्री नारायण राणे यांनी लगावला. मोदी म्हणजे विनाश आणि काँग्रेस म्हणजे विकास. 

देशाला वाचवायचे असेल तर काँग्रेसला मत द्या आणि विकासाला साथ द्या, असे आवाहन राणे यांनी वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे केले. वर्धा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सागर मेघे यांच्या प्रचारार्थ पुलगाव येथे झालेल्या जाहीर सभेत राणे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवत असतानाच काँग्रेसच्या विकासात्मक कामांचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘लोकसभेची निवडणूक विकासाच्या मुद्दय़ावर लढवली गेली पाहिजे. मात्र, आमच्या विरोधकांकडे मुद्देच नसल्यामुळे ते विकासावर बोलत नाहीत. केवळ काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करत आहेत. 

मीडियाचा वापर करून मध्यंतरी मोदी यांची लाट आणण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, गुजरात विकासाचा फोलपणा लोकांच्या लक्षात आल्यामुळे ही लाट आता ओसरली आहे.’ यांचा कसला आलाय विकास? गोरगरीब शेतक-यांच्या जमिनी मातीमोल भावाने घेऊन दोन-चार उद्योगपतींच्या घशात घातल्यामुळे विकास झाला असे म्हणता येईल का, असा सवाल राणे यांनी केला. काय आहे गुजरातचे वास्तव. विकासाच्या गप्पा मारणा-यांना जन्माला येणा-या मुलाचीही काळजी घेता येत नाही. 

कुपोषणामुळे हजारो बालके गुजरातमध्ये मृत्युमुखी पडत आहेत. दर हजारी ४२ मुले कुपोषणाने गुजरातमध्ये मरत आहेत. महाराष्ट्रात हा आकडा केवळ १२ आहे, असे त्यांनी सांगितले. मोदी म्हणतात गरिबी कमी केली. कुणाची? स्वत:ची का लोकांची? रिझव्‍‌र्ह बँकेची आकडेवारी सांगते की, मागील दहा वर्षात महाराष्ट्राने १३.७ टक्के लोकांना दारिद्रय़रेषेच्या वर आणले. गुजरातने किती लोकांना आणले? केवळ आठ टक्के. देशात जितकी परदेशी गुंतवणूक होते त्यातील २१ टक्के एकटय़ा महाराष्ट्रात होते. 

गुजरातमध्ये केवळ १६ टक्के आहे. मग कोणत्या क्षेत्रात गुजरात आघाडीवर आहे ते आकडेवारी देऊन सांगावे, असे आव्हान नारायण राणे यांनी दिले. नरेंद्र मोदी हा विकासपुरुष नाही, तर विनाशपुरुष आहे, असे आता त्यांच्याच पक्षातील उमा भारती म्हणत आहेत. अशा विनाशकारी माणसाच्या हातात आपण सत्ता देणार आहोत काय, असा सवाल राणे यांनी उपस्थितांना केला