पुणे- मुंबईतील एका विधी महाविद्यालयाच्या 20 विद्यार्थिनी व 26 विद्यार्थ्यांना लोणावळ्यात पार्टीत अश्लील नृत्य करताना पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतले. लोणावळ्याजवळील तुंगार्लीतील गोल्ड व्हॅलीत दारू व हुक्काच्या नशेत चूर होऊन अश्लील व बिभत्स नृत्य सुरु असलेली पार्टी सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी रेड मारली. त्यावेळी चेह-यावर मास्क लावून डान्समध्ये मग्न असलेल्या 20 मुलींसह 26 महाविद्यालयीन तरूणांना अटक केली.
तुंगार्ली भागातील गोल्ड व्हॅली परिसरात एका बंगल्यात मुंबईची एका विधी महाविद्यालयातील मुला-मुलींनी पार्टीचे आयोजन केले होते. त्यासाठी ते लोणावळयात सायंकाळीच दाखल झाले होते. त्यांनी पार्टीसाठी दारू, हुक्का, सिगारेट व इतर साहित्याची जुळवाजुळव केली. त्याचबरोबर बंगल्यात या मुलांनी डीजेही लावला. मात्र, त्याचा आवाज मोठा असल्याने व हे लोक नशेत चूर झाल्याने त्यांच्या लक्षात ही बाब आली नाही. अखेर कोणीतरी पोलिसांना याबाबतची माहिती कळवली. पोलिसांनी लागलीच धाड टाकत रात्री साडेबाराच्या सुमारास सर्वांना ताब्यात घेतले.