हात स्वच्छ असावेत

अण्णा हजारे यांनी अनेक भ्रष्ट मंत्र्यांचे वस्त्रहरण केले. त्यापैकी सुरेश जैन आता जेलची हवा खात आहेत. बबनराव घोलप यांनाही शिक्षा झाली. सुरेश जैन यांच्यावर अण्णांनी आरोप केले तेव्हा त्यांनी अण्णाच कसे भ्रष्ट आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर अण्णांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात अण्णांच्या समोर प्रति उपोषण केले. मात्र अण्णांचे काही बिघडले नाही. उलट सुरेश जैन आता तुरुंगात आहेत. अण्णांचे हात स्वच्छ होते म्हणून अण्णांना हे शक्य झाले. ज्यांचे स्वतःचे हात स्वच्छ असतील त्यांनीच लोकांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलावे अन्यथा त्यांना लोकांच्या भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नसतो. आम आदमी पार्टीच्या उथळ नेत्यांना हेच कळत नाही. हे सर्वांच्या भ्रष्टाचारावर  आघात करत सुटतात पण त्याआधी स्वतःचे हात स्वच्छ आहेत का हे पाहत नाहीत आणि त्यांचा भ्रष्टाचार कोणी उघड केला तर ते सहन होत नाही. अंजली दमानिया या सध्या अशाच एका प्रकरणात उघड्या पडल्या आहेत. आमच्या हातात पुरावा असो की नसो, आम्ही लोकांवर आरोप करणार. पण आमच्या विरोधात पुरावे असूनसुध्दा लोकांनी आमच्यावर आरोप करता कामा नये असे त्यांचे म्हणणे असते. 

या पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना एका वृत्तवाहिनीने आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आणि त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या तेव्हा अरविंद केजरीवाल शब्दशः रडकुंडीला आले होते. कारण भ्रष्टाचार निर्मुलनाच्या गप्पा मारतानाच दिल्लीतल्या रॉकेल माफियाला तिकिट दिले होते. हे उघड करताच त्याचा खुलासा करता करता अरविंद केजरीवाल यांची कशी फे फे उडाली हे सगळ्या जगाने पाहिले आहे. अरविंद केजरीवाल दुसर्‍या नेत्यांवर ज्या वस्तुस्थितीच्या आधारे आरोप लावतात. त्याच वस्तुस्थितीचा वापर करून त्यांच्यावर किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांवर आरोप लावला जातो तेव्हा तो त्यांना मान्य नसतो. तशा आरोपाचा खुलासा करण्याऐवजी ते आरोप करणारे लोक कसे भ्रष्टाचारी आहेत हेच ते सांगत बसतात. नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या विरोधात अंजली दमानिया या उभ्या आहेत. नितीन गडकरी एका कंपनीचे मालक आहेत म्हणजेच ते भ्रष्ट आहेत असा अंजली दमानिया यांचा शोध आहे. एखादा उद्योग उभारणे म्हणजे भ्रष्ट असणे या त्यांच्या आरोपाला कोणी हिंग लावून विचारत नाही. त्या आरोपाचे कसलेही पुरावे त्यांनी सादर केलेले नाहीत. मात्र दररोज त्याच त्या आरोपांचा पुनरुच्चार त्या स्वतः आणि त्यांचे प्रचारक करत असतात. तिथे आपल्या तोंडाला कोणी हात लावू नये असे त्यांचे म्हणणे असते. 

आरोपांचे पुरावे देण्याची जबाबदारी आमच्यावर नाही. असे त्यांनी स्वतःच ठरवून टाकले आहे. अशा या बेजबाबदार अंजली दमानिया यांचा कारभार तरी स्वच्छ आहे का? तर असे लक्षात येते की कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरणाच्या परिसरात त्यांनी लोकांना भुलथापा देऊन आणि कायद्याची पायमल्ली करून जमिनी हडप केलेल्या आहेत. कोंढाणे धरण परिसर विकास मंच या संस्थेचे अध्यक्ष अनिल गोगटे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या समोर दमानिया कुटुंबियांची कुंडली मांडली. त्यांनी लोकांना गोड बोलून जमिनी कशा हडप केल्या आहेत याची सविस्तर माहिती अनिल गोगटे आणि शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी दिली. आजवर अरविंद केजरीवाल, अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदा घेऊन अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले परंतु या पत्रकार परिषदांमधून त्यांनी कितीही खोटे आरोप केले असले तरी त्यांच्या आरोपांमुळे नुकसान होणार्‍या कोणत्याही नेत्याने पत्रकार परिषदेत घुसून पत्रकार परिषद उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला नाही. पण आम आदमीने मात्र काल असा प्रयोग केला. या पत्रकार परिषदेत घुसून आम आदमीचे प्रवक्ते अजय संगी यांनी किशोर तिवारी यांच्या हातातला ध्वनीक्षेपक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. आम आदमी पार्टीची लोकशाही अशा प्रकारची आहे. 

दमानिया कुटुंब हे शेतकरी नसून बिल्डर आहे. स्वतः शेतकरी नसणार्‍यांना शेतजमिनी विकत घेता येत नाहीत अशी जमीन विकत घेण्यास कायद्याने बंदी आहे. परंतु बिल्डर असलेल्या दमानिया कुटुंबाने शेतकरी असल्याचे भासवून अनेक शेतकर्‍यांकडून जमिनी विकत घेतल्या. शेतजमीन विकत घेताना ती स्वस्तात पडते मात्र ती नंतर बिल्डरला बांधकामासाठी विकताना कैकपटींनी किंमत येते. म्हणून दमानिया यांनी शेतजमिनी विकत घेतलेल्या आहेत. असा गोगटे आणि  तिवारी यांचा आरोप होता. या आरोपला उत्तर देण्यासाठी दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत या आरोपाच्या मागे नितीन गडकरी आहेत असा प्रत्यारोप केला. त्यांच्यावर केल्या जाणार्‍या आरोपांच्या मागे कोण आहे याचा काही प्रश्‍नच नव्हता. दमानिया कुटुंबांने स्वतः शेतकरी नसताना कायद्याची पायमल्ली करून शेतजमीन विकत घेतली आहे की नाही हा प्रश्‍न आहे. त्याचे तर्कशुध्द उत्तर अंजली दमानिया यांच्याकडे नसावे असेल त्यांनी या शेतजमिनी विकत घेण्यापूर्वीचा आपल्या कुटुंबाचा सातबाराचा उतारा सादर केला पाहिजे. तो केला की सगळ्या आरोपांचे चोख उत्तर मिळते. पण तसा सातबारा उतारा न दाखवता दमानिया यांनी हेत्वारोप केले आणि आपला अपराध झाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अजूनही आपल्यावर झालेल्या आरोपांचे तर्कशुध्द उत्तर दिले पाहिजे. विषयांतर करून ते उत्तर टाळण्याचा त्या प्रयत्न करत आहेत याचा अर्थ त्यांनी बेकायदा जमिनी हडप केल्या आहेत असा होतो. आकांडतांडव करणे म्हणजे आरोपाला उत्तर देणे नव्हे. अंजली दमानिया  इतर लोकांवर बेफाट आरोप करतात तेंव्हा त्या आरोपामुळे त्या लोकांची मनःस्थिती कशी होत असेेल याचा त्यांनी विचार केला पाहिजे. आवश्यक तिथे भ्रष्टाचार निर्मुलन केलेच पाहिजे पण ते पुराव्यानिशी केले पाहिजे आणि त्या आधी आपले हात स्वच्छ असले पाहिजेत.