लंडन- जगातील पहिली महिला बलात्कार, लैंगिक छळ परिषद लंडन येथे १० जून ते १३ जून दरम्यान भरत असून या परिषदेत १४१ देश सहभागी होत आहेत. या परिषदेचे अध्यक्षपद संयुक्त राष्ट्राची विशेष दूत व हॉलीवूड अभिनेत्री अँजेलिना जोली व ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री विलियम हेग हे भूषविणार आहेत. ब्रिटन सरकारतर्फे ही शिखर परिषद होत आहे.
या हायप्रोफाईल शिखर परिषदेत प्रामुख्याने युद्ध काळात महिलांवर होत असलेले बलात्कार, लैंगिक छळ यांसंबंधीच्या तपास प्रक्रियेत आवश्यक असलेल्या सुधारणांवर चर्चा होणार आहे. युद्ध काळात अनेक महिलांना सामुहिक बलात्कार, लैंगिक छळ, लैंगिक शोषण अशा घटनांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा सामुहिक बलात्काराचा हत्यार म्हणून वापर होतो त्यावर चर्चा होणार आहे आणि अशा घटनात बहुतेक वेळा गुन्हेगार कायदा आणि शिक्षेपासून दूरच राहतो त्यासाठी तपास प्रक्रियेत काय सुधारणा हव्यात यावरही चर्चा होणार आहे.
या परिषदेत युद्धकाळात बलात्काराची घटना घडली तर महिलांनी संबंधितांना शिक्षा व्हावी म्हणून कोणते पुरावे जमा करून ठेवावेत याचेही मार्गदर्शन केले जाणार आहे. या परिषदेला लष्कर, पोलिस आणि या विषयातले तज्ञ उपस्थित राहणार आहेत. अँजेलिना जोली आणि विलियम हेग गेली दोन वर्षे या विषयांवर काम करत आहेत. सेनेतर्फे जवानांना प्रशिक्षण देताना लैगिक अत्याचाराच्या गुन्हयाबद्दल होऊ शकणार्याे शिक्षा यांचीही माहिती द्यावी यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे हेग यांनी सांगितले.