आयफोन ६ चे फोटो लिक – अफवांना ऊत

अॅपलच्या आयफोन ६ चे फोटो कांही इंटरनेट साईटवरून प्रसिद्ध करण्यात आले असल्याने हा स्मार्टफोन कसा असेल याविषयीच्या अफवांनाही ऊत आला आहे. अॅपलने घेतलेल्या विविध पेटंटवरूनही कांही अंदाज बांधले जात असून त्यानुसार यंदाच्या वर्षीही अॅपल दोन आयफोन एकाचवेळी लाँच करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अॅपलने आपल्या उत्पादनांबाबत कायमच गुप्तता बाळगली असली तरी या क्षेत्रातील तज्ञ अॅपलचे नवे फोन कसे असतील याचा अंदाज वर्तवित आहेत.

कांही तज्ञांच्या मते मे पासून आयफोन सहाच्या स्क्रिनचे उत्पादन सुरू केले जात आहे. ४.७ इंच व ५.५ इंच स्क्रीनचे हे आयफोन सिक्स असतील असा अंदाज आहे. आयफोन ५एस साठी फिंगरप्रिंट स्कॅनर प्रोटेक्शन दिले गेले होते. आयफोन सिक्ससाठीही ते असेलच शिवाय आयओएस आठ ऑपरेटिंग सिस्टीम आणि हेल्थ, फिटनेस व ट्रॅकिगसंबंधी अनेक अॅपही त्याला दिली जातील असा अंदाज आहे.

यंदाच्या अॅपल डेव्हलपर परिषदेत आयओएस ८ सादर केले जाणार आहे. फिटनेस आणि हेल्थ अॅपमुळे हार्ट रेट, ब्लडप्रेशर, हायड्रेशन लेव्हल युजरला कळू  शकणार आहे तसेच ट्रॅकींग अॅप मुळे लोकेशन ट्रॅकींग करता येणार आहे. या फोनला स्पाईंग अॅपही दिले जाईल तसेच इंटरचेंजेबल कॅमरा लेन्स हे या फोनचे वैशिष्ठ असेल असे जाणकार सांगतात. या फोनला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा असेल असेही समजते.