राजकीय अस्थैर्य अर्थव्यवस्थेला मारक ठरेल

मुंबई – सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर देशात अस्थिर सरकार आल्यास त्याचा अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल असा इशारा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे. देशात स्थिर सरकार येईल या अपेक्षेने सध्या शेअर बाजारात तेजी दिसत आहे. या तेजीच्या पार्श्‍वभूमीवर गर्व्हनर बोलत होते. 

देशात स्थिर राजवट येईल ही बाजाराची अपेक्षा आहे. पण तशी ती आली नाही तर मात्र बाजार विचलित होईल आणि त्यात मोठ्या उलथापालथी होतील. तशा उलथापालथीसाठी आपण मनाने तयार राहिले पाहिजे, असे रघुराम राजन म्हणाले. रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

रुपयाने आता डॉलरच्या तुलनेत साठची पातळी राखली आहे, याची कारण मीमांसा त्यांनी केली. अर्थव्यवस्थेत सुद्धा साडे पाच टक्के वृद्धी दिसून येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. केंद्रात अस्थिर सरकार येऊन त्याने अर्थव्यवस्थेला सकारात्मक संदेश दिले तरीही आर्थिक अस्थिरता टळू शकेल, असे रघुराम राजन यांनी प्रतिपादन केले.