सेन्सेक्सची विक्रमी घोडदौड

मुंबई/ वृत्तसंस्था – गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई शेअर बाजारातील व्यवहारांना सुरुवात होताच उर्जा, तेल, गॅस, वाहन आणि बँकींग क्षेत्रातील समभागांच्या विक्रमी खरेदीने निर्देशांक २२,४६४.८६ या नव्या विक्रमी आकड्यावर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही ३२.९५ अंकानी वाढ होऊन निफ्टीनेही ६, ७२६.८५ असा उच्चांक प्रस्थापित केला. 

 
‘बेसल  ३’ च्या अंमलबजावणीला मुदतवाढ मिळाल्याने बँकिंग क्षेत्रात समभागांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. मागील आठवड्यापासूनच निर्देशांकात सातत्याने वाढ होता आहे. शुक्रवारी सेन्सेक्स १२५.९० अंकांच्या वाढीसह २२,३३९.९७ वर बंद झाला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ५४.१५ अंकांची वाढ झाली आणि तो ६.६९५.९० वर बंद झाला.

 

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. सेबीच्या आकडेवारीनुसार ‘एफआयआय’ने १२ मार्चपासून बाजारात १८,०७३ कोटींची गुंतवणूक केली आहे.