हवामान बदलामुळे उपासमारीचे संकट

योकोहामा – पूर्ण जगाला ग्रासून टाकणा-या हवामान बदलाच्या समस्येचे गंभीर परिणाम जगाच्या प्रत्येक खंडात आणि सर्व महासागरांमध्ये दिसून येत असून हरित वायूंच्या उत्सर्जनावर निर्बंध न आणल्यास उपासमारीसारख्या भीषण संकटाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते; असा इशारा हवामान बदलावर अभ्यास करण्यासाठी ‘युनो’ने नियुक्त केलेल्या अनेक देशातील तज्ज्ञांच्या अभ्यासगटाने दिला आहे.

या अभ्यासगटाचा दुसरा अहवाल सादर केल्यानंतर या तज्ज्ञांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेऊन या अहवालातील अभ्यास आणि आवश्यक उपाय योजनांची माहिती दिली. या अभ्यासगटाने आपला पहिला अहवाल सन २००७ मध्ये युनोला सादर केला आहे. हवामान बदलांमुळे हिमखंड वितळत आहेत. आर्क्टिक महासागरामधील प्रचंड हिमखंडही वितळू लागले आहेत. पोवळ्याचे स्त्रोत नसता होता आहेत. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत संपुष्टात येत आहेत. उष्ण हवेचे पट्टे निर्माण होत आहेत. पर्जन्यचक्र बिघडून अतिवृष्टीचे प्रकार वाढले आहेत. अनेक मासे आणि जलचर स्थलांतर करीत असून काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत; असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

समुद्राचे वेगाने प्रसरण होत असून त्यामुळे किनारपट्टीवरील मानवी वस्त्या आणि काही सागरी जीवांना धोका निर्माण झाला आहे. खारपाड जमिनीमध्येही वेगाने वाढ होत आहे. सध्याच्या परिस्थितीत हवामान बदलाच्या दुष्परिणामांपासून कोणीही दूर शकलेले नाही; असे या अभ्यासगटाचे अध्यक्ष राजेंद्र पचौरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आगामी काही दशकांमध्ये हवामान बदलांमुळे मानवी अस्तित्वावर आणि एकूण जीवसृष्टीवर होणा-या दुष्परिणामांचा उहापोह या अहवालात शेकडो तज्ज्ञांच्या अभ्यासाद्वारे करण्यात आला आहे.

एकविसाव्या शतकात हवामान बदलामुळे आर्थिक विकासाच्या गतीला खीळ बसली आहे. दारिद्र्य निर्मूलनाचे आव्हान अधिक गडद झाले आहे. अन्न सुरक्षा धोक्यात आली आहे. विशेषत: शहरी भागांमध्ये भूक ही तीव्र समस्या निर्माण होत आहे. या सर्व संकटांचे सामजिक परिणाम म्हणून जमीन अथवा इतर स्त्रोतांच्या मालकीवरून संघर्ष उभे राहतील. हवामान बदलाचे संकट हे भविष्यातील संकट नसून त्याचे परिणाम सध्या दिसून येत आहेत; असे या अहवालात शास्त्रज्ञ आवर्जून नमूद करतात.

अमेरिकेच्या पशिमेला पर्वतावरील हिम वितळत असल्याने या भागात उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचे दुर्भिक्ष असणार आहे. अलास्का येथे महासागरातील हिमखंड वितळून समुद्रात कोसळत असल्याने प्रचंड विनाशकारी लाटा किना-याला धडकत असल्याने हजारोंना स्थलांतर लागले आहे; उदाहरणेही तज्ज्ञांनी दिली आहेत. सध्या या बाबत भरपूर माहिती आणि अनुभवही गाठीशी असल्याने आता या समस्येकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही आणि क्षम्यही नाही; असे जागतिक हवामानशास्त्र संघटनेचे सरचिटणीस मिशेल जेरॉड यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment