‘गुजरातचा विकास काँग्रेसच्या काळातील – शरद पवार

परतवाडा – देशाला काँग्रेसमुक्त करण्याची भाषा करणार्‍या भाजपचे देशासाठी योगदान नाही. केवळ जातीयवाद पसरवण्याचे काम या पक्षाकडून होत आहे. अशा जातीयवादी शक्तींना थारा देऊ नका, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी केले.  काँग्रेस आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी परतवाडा येथील परेड ग्राउंडवर आयोजित सभेत पवार बोलत होते. ते म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या काळात गुजरातमध्ये दंगली झाल्या. यात अल्पसंख्याक समुदायाच्या खासदाराला जिवंत जाळण्यात आले. त्यांच्या पत्नीला न्याय मिळत नाही. अशा धर्मांध शक्तींना सत्तेपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. मोदी गुजरातच्या विकासाचा ढोल बडवत आहेत. 

वास्तवात हा विकास माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी, अरविंदसिंह सोलंकी, चिमणभाई पटेल यांच्याच कार्यकाळात झाला. विकासाचा वाढलेला दर मोदींच्या कार्यकाळात मात्र घसरला आहे. महाराष्ट्र कृषिमाल उत्पादनासह भांडवली क्षेत्रात अव्वल, तर गुजरात सहाव्या क्रमांकावर आहे. केवळ गुजरातच्या विकासाच्या नावावर मोदी पंतप्रधानपदाचे स्वप्न रंगवत असल्याचे ते म्हणाले. सभेला अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, आमदार केवलराम काळे, रावसाहेब शेखावत, रवि राणा, नगराध्यक्ष अरुण वानखडे, जोगेंद्र कवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेत उपस्थित मान्यवरांचीही भाषणे झाली.  या निवडणुकीनंतर पुन्हा काँग्रेस आघाडीचेच सरकार केंद्रात येईल आणि काँग्रेसचाच पंतप्रधान होईल, असा विश्वास केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शेगाव येथील प्रचार सभेत व्यक्त केला.  

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गट आघाडीचे बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कृष्णराव इंगळे यांच्या प्रचारार्थ ही सभा स्व. गजाननदादा पाटील मार्केट यार्डवर झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे होते. अन्न व औषध प्रशासनमंत्री मनोहर नाईक, अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख, पीरिपाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोपानराव साठे, आमदार राहुल बोंद्रे, आमदार दिलीपकुमार सानंदा, जिल्हा परिषद अध्यक्ष वर्षा वनारे, जिल्हा परिषद महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तबस्सुम हुसेन, माजी आमदार नाना कोकरे, माजी मंत्री उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा आशा झोरे, सुबोध सावजी, सुभाष ठाकरे, माजी आमदार धृपदराव सावळे उपस्थित होते.