डॉ.हिनाच्या प्रचारासाठी उतरले विजयकुमार गावीत

नंदुरबार : नंदूरबार लोकसभा मतदारसंघतील भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावीत यांचा प्रचार राष्ट्रवादीचे आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांनी करण्यास सुरुवात केली आहे. डॉ. हिना गावीत यांच्या रॅलीत ते सहभागी झाले. अनेकांना ते कन्या हिना हिचा प्रचार करणार नाही असे वाटत होते. मात्र त्यांनी रॅलीत सहभागी होवून जमलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केल्याने अनेक राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला डॉ. गावीत यांचा भाजपा प्रवेश आणि त्यांना मिळालेली उमेदवारीमुळे नंदुरबार मतदारसंघ राज्यभरात चर्चेत राहिला आहे. या सर्व प्रक्रियेपासून डॉ.विजयकुमार गावीत हे मात्र लांबच राहिल्याचे दिसून येत होते. हिना यांच्या दिल्लीतील पक्ष प्रवेशाच्या वेळीदेखील ते उपस्थित नव्हते. शिवाय त्यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कुमुदिनी यांनीदेखील दूर राहणेच पसंत केले होते.

डॉ. हिना यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे शनिवारी प्रथमच नंदुरबारात आगमन झाले. त्यानिमित्त कार्यकर्त्यांनी त्यांची रॅली काढली. रॅलीत भाजपचे जिल्हरयातील कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादीचेही अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. बॅनर, झेंडे यांचाही समावेश रॅलीत होता. या रॅलीत सुरुवातीपासूनच डॉ. गावीत व कुमुदिनी गावीत सहभागी झाल्या होत्या. किंबहुना ते कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत होते. संपूर्ण शहरात फिरलेल्या रॅलीत तर सहभागी होतेच शिवाय रॅली ज्या ठिकाणी विसर्जीत झाली त्या त्यांच्या निवासस्थांनी डॉ.गावीतांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले. यामुळे डॉ.गावीत हे आता उघडपणे कन्येचा प्रचारात सक्रीय होतील हे स्पष्ट झाले आहे.