मुंबई : बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेचे शिर्डीतील लोकसभा उमेदवार आणि माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी पदाचा गैरवापर करून बेहिशोबी संपत्ती जमवल्याच्या आरोपावरून घोलप आणि त्यांची पत्नी शशिकला यांना तीन वर्षांचा सश्रम कारावास तसेच एक लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या निकालामुळे घोलप यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.
शिवसेना-भाजप युतीच्या मंत्रिमंडळामध्ये बबन घोलप हे समाजकल्याणमंत्री होते. सन १९९९ मध्ये युतीच्या मंत्रिमंडळात मंत्री झाल्यावर अवघ्या साडेतीन वर्षांत त्यांच्या व पत्नीच्या नावे एकूण ५० लाख रुपये जमा असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) तपासात आढळून आले. त्याचवेळी त्यांचा निवडणूक खर्च ८० लाख रुपये झाला होता.
या प्रकरणी लाच-लुचपत खात्याने घोलप यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांना तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे घोलप आगामी लोकसभा निवडणूक लढवू शकणार का; असा प्रश्न निर्माण झाला आहे.