पुणे : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूकीनंतर राज्यात महायुतीची सत्ता आल्यास मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी बोलताना स्पष्टट केले. त्यासोबतच ‘महायुतीचे निर्णय मीच घेत असतो,’ याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी बोलताना केला.
पुणे येथे धनगर समाज उन्नती मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या चिंतन शिबिरात ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार प्रकाश शेंडगे, माधुरी मिसाळ, विकास लवटे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना मुंडे म्हणाले, ‘‘आगामी काळातील विधानसभा निवडणूकीनंतर जर राज्यात शिवसेनेचे जास्त आमदार निवडून आले, तरी उपमुख्यमंत्रिपद आपण स्वीकारणार नाही, मी उपमुख्यमंत्री होणे आता आपल्याला पटते का,’ असा प्रश्न त्यांनी भाषणात उपस्थित केला. त्यावर, ‘नाही’ असे उत्तर आल्यावर ते म्हणाले, ‘‘राज्यात शिवसेनेचे जादा आमदार आले, तर मी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाही.’’
केवळ चुकीच्या राजकीय संगतीमुळे धनगर समाजाचा उद्धार झाला नाही. आमच्या महायुतीच्या जाहीरनाम्यात सध्या असलेले ‘धनगड’ हे नाव वगळून धनगर हे नाव करणार असल्याचे लिहून देणार आहोत. त्यामुळे या समाजाला आरक्षणाचा फायदा होईल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी माझा विरोध नसून, आमच्या आरक्षणाला हात न लावता त्यांना आरक्षण देण्यास आमचा पाठिंबा आहे, असेही यावेळी बोलताना मुंडे यांनी स्पष्ट केले.