पुणे – अनेक दहशतवादी हल्ल्यातील आरोपी इंडियन मुजाहिदीनचा (आयएम) दहशतवादी यासिन भटकळला पुणे सेशन कोर्टाने आज (शुक्रवार) 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भटकळला पुणे एटीएसने गुरुवारी औपचारिक अटक करुन कडक पोलीस बंदोबस्तात आज पुण्यातील कोर्टात हजर केले. जर्मन बेकरी स्फोटात चौकशीसाठी भटकळला 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी केली.
विशेष सत्र न्यायाधीश एस. बी. दरणे यांनी ती मान्य केली. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटांवेळी तेथील सीसीटीव्ही कॅमे-यांच्या फुटेजमध्ये भटकळ स्पष्ट दिसतो, तेसच या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींना अटक करायची आहे. त्यामुळे भटकळला पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. ती कोर्टाने मान्य केली. देशात विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात यासिन भटकळ आरोपी आहे. गेल्यावर्षी त्याला आणि त्याचा साथीदार असादुल्ला अख्तर याला भारताच्या नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली होती.