मुंबईत सात मजली इमारत कोसळली, महिलेचा मृत्यू

मुंबई – येथील वाकोल्यात सात मजली इमारत झोपड्यांवर कोसळली. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत.  ढिगा-याखाली अनेकजण दबले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ढिगा-याखालून दोन महिन्यांचे बाळ सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याचे मदत पथकाने सांगितले आहे.  

वाकोला येथील कलिना भागातील यशवंतनगमध्ये सात मजली इमारत आज (शुक्रवार) दुपारी कोसळली आहे. या दुर्घटनेत सुधा श्रीधरन (32 वर्षे) यांचा मृत्यू झाला असून अक्षय केसकर (18 वर्षे), सिता केसकर (60 वर्षे), रोहिणी जगताप (47 वर्षे) हे जखमी झाले आहेत. इमारत कमकुवत झाली असल्याने आधीच रिकामी करण्यात आली होती, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, रिकामी इमारत झोपड्यांवर कोसळली असल्याची माहिती आहे. त्यामुळे झोपड्यांतील नेमके किती लोक ढिगा-याखाली अडकले आहेत, याची माहिती मिळालेली नाही. 

घटनास्थळी अग्निशमन विभाग, मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापनचे पथक दाखल झाले आहे.  ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.   मुंबईत याआधीही इमारती कोसळल्या आहेत. गेल्या वर्षी 5 एप्रिल रोजी मुंबईत मोठी इमारत दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेत 42 जणांचा मृत्यू झाला होता. शीळफाटा येथील लकी कंपाऊंडमध्ये इमारत कोसळली होती. सुरुवातीला ती तिरपी झाली आणि नंतर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती.