मुंबई – देशाच्या अणु कार्यक्रमाचा पाया रचणारे महान वैज्ञानिक होमी जहांगीर भाभा यांचा मुंबईतील अलिशान बंगला विक्रीसाठी काढला गेला असून त्यासाठी निविदा मागविल्या गेल्या आहेत. या बंगल्याला २७५ ते ३०० कोटी रूपये मिळतील असा अंदाज वर्तविला जात आहे. बंगला विक्रीसाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रॉपर्टी सल्लागार जॉस लँग लॉसेल कंपनीचा सल्ला घेतला गेला आहे असेही समजते.
मुंबईच्या प्रतिष्ठीत मलबार हिल भागात १५९३ चौरस मीटर क्षेत्रात हा तिमजली बंगला असून त्यात १७ खोल्या, १ खासगी लायब्ररी, बगिचा आणि गॅरेज आहे. हा बंगला ५० वर्षांपूर्वी होमींनी स्वतःच्या देखरेखीखाली बांधून घेतला होता. सध्या हा बंगला नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट संस्थेच्या ताब्यात आहे.
होमी भाभांचे २४ जानेवारी १९६६ रोजी विमान अपघातात निधन झाल्यानंतर या बंगल्याची मालकी त्यांचे भाऊ जमशेद भाभा यांच्याकडे आली. जमशेद एनसीपीएचे अध्यक्षही होते. त्यांचे २००७ साली निधन झाल्यानंतर हा बंगला एनसीपीएसच्या मालकीचा झाला आहे. निविदा भरण्याची अंतिम तारीख १७ जून असून प्रति चौरस फूट १ लाख ४५ हजार रूपये दराने त्याची विक्री होईल अशी अपेक्षा आहे.