बँकांच्या सेवादरात १ एप्रिलपासून वाढ

मुंबई- भारतीय बँक संघटनांनी येत्या १ एप्रिलपासून ग्राहकाला दिल्या जाणार्‍या सेवांचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला असून काही बँकांनी ही दरवाढ अगोदरच लागू केली आहे. त्यानुसार एटीएम, ड्राफट, डुप्लिकेट पिन, एसएमएस अॅलर्ट आदि सेवा महाग होणार आहेत. बँकांना एटीएम सुरक्षेवर जो जादा खर्च करावा लागतो आहे त्याच्या भरपाईसाठी ही दरवाढ केली जात असल्याचे समजते.

खासगी आणि राष्ट्रीयीकृत अशा सर्व बॅकानी ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅक्सिस बॅकेने इसीएस डेबिट फेल झाल्यास सध्याच्या २०० रूपयांऐजवी ३५० रूपये, डुप्लीकेट पिन चार्जेस, डीडी कॅन्सल करणे यासाठी १०० रूपये तर सेव्हिंग अकौंट मिनिमम बॅलन्स फेल ला प्रतिमहिना २५० रूपये ग्राहकांकडून घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. सिटी युनियन बँकेने लॉकर भाडे २ हजार वरून ५ हजार रूपये तर एसएमएस अॅलर्टसाठी ५० पैसे आकारण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

युनियन बँकेने १० हजार रूपयांच्या ड्राफ्टसाठी ३८ रूपयांऐवजी ५० रूपये आकारण्याचे ठरविले असून स्टेट बँकही लवकरच त्यांच्या वाढीव सेवा दराची घोषणा करेल असे समजते. १ एप्रिलपासून सर्व बँका ही नवी दरवाढ लागू करणार आहेत.