भारतात चीनपेक्षाही कमी पगार

दिल्ली – आजपर्यत चीन कर्मचारी आणि मजुरांना सर्वाधिक कमी मजुरी मिळणारा देश म्हणून ओळखला जात होता. चीनमधील स्वस्त लेबरमुळेच चीनी वस्तू स्वस्तात विकायला परवडतात असेही सांगितले जात होते. टॉवर वॉटसन या जागतिक पातळीवर सेवा देणार्‍या कंपनीच्या अहवालानुसार मात्र चीनपेक्षाही भारतातील मजुरांनाच नव्हे तर अधिकारी श्रेणीतील लोकांनाही कमी वेतन दिले जात आहे. चीममध्ये दिले जात असलेले वेतन हे भारतीयांच्या तुलेनेत जवळजवळ दुप्पट असल्याचे हा अहवाल सांगतो.

यामागे अनेक कारणे दिली जात असली तरी सर्वात मुख्य कारण आहे ते रूपयाचे घसरलेले मूल्य. २०१३ मध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रूपयात लक्षणीयरित्या घसरण झाली असताना चीनी येन मात्र डॉलरच्या तुलनेत मजबूत बनला आहे. परिणामी वेतनातील हा फरक दिसून येत आहे. अधिकारी श्रेणीतील लोकांना चीनमध्ये सरासरी वार्षिक पगार २ लाख १५ हजार डॉलर्स मिळतो आहे तर भारतात हेच प्रमाण ९४ हजार डॉलर्स इतके आहे असेही या अहवालात नमूद केले गेले आहे.