माओवाद्यांची सलामी

छत्तीसगडमध्ये २०१३ भीषण घटनेनंतर पुन्हा एकदा माओवादी सक्रिय झाले आहेत. माओवादी चळवळीचे एक वैशिष्ट्य असे की, एक हल्ला केल्यानंतर बरेच दिवस शांत बसतात. आता त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे असे मानून पोलीस निवांत बसतात. ते आता  संपत आले आहेत असा निष्कर्ष काढून पोलीस बेसावध राहतात पण माओवादी शांततेच्या या काळात पुढच्या नव्या जोरदार हल्ल्याची तयारी करीत असतात. आताही तसेच झाले आहे.  २०१२ च्या शेवटास त्यांनी छत्तीसगडमध्ये मोठा हल्ला केला होता. त्यात माजी केन्द्रीय मंत्री विद्याचरण शुक्ला यांच्यासह २७ कॉंग्रेस नेते मारले गेले होते. माओवादी चळचळीचा एक प्रकारे कर्दनकाळ ठरलेले आमदार कर्मा  हेही याच हल्ल्यात मारले गेले होते. आता जवळपास वर्षाच्या अंतराने माओवादी दहशतवाद्यांनी छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. काल त्यांनी १६ जवानांचे प्राण घेतले. हा हल्ला सुकमा जिल्ह्यात टोंगपाल या गावाजवळ झाला. तो दिवसा ढवळ्या झाला. दुपारी ११ वाजतात्यांच्या मोठ्या गटाने या भ्याड हल्ल्याद्वारे आपले आव्हान अजून कायम असल्याचे दाखवून दिले.  

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर झालेल्या या हल्ल्याची पूर्व कल्पना नव्हती. गुप्तचर यंत्रणांना त्याचा कसलाही सुगावा लागला नव्हता. हा हल्ला एवढा विचारपूर्वक आणि योजनापूर्वक केलेला होता. तो राखीव पोलीस दलाच्या जवानांसाठी अनपेक्षित होता. त्यांना स्वतःचे संरक्षण करण्याचीही संधी मिळाली नाही. बस्तर जिल्ह्याच्या झिराम घाटी भागात गतवर्षीच्या हल्ल्याच्या परिसरातच हाही हल्ला झाला. एकाच जागेवर पुन्हा हल्ला होणे हे बेसावधपणाचे लक्षण असते असे मानतात. त्यामुळे आता या हल्ल्याची चौकशी होणार आहे. या ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्या कामात माओवाद्यांचा वारंवार अडसर येत आहे. म्हणून दुरुस्तीचे काम करणार्‍या मजुरांना पोलिसांचे संरक्षण देण्यात आले होते. पोलिसांच्या संरक्षणात हे काम व्यवस्थित सुरु असताना काल अचानकपणे हा हल्ला झाला. गेले काही दिवस तरी दहशतवादी गटांचा कसलाही त्रास झाला नाही म्हणून जवान बेसावध राहिले. तीच माओवाद्यांना संधी वाटली. तिचा त्यांनी फायदा घेतला. त्यांनी आधी  पोलिसांवर किरकोळ हल्ला केला आणि जंगलात पलायन करत असल्याचे नाटक केले. पोलीस त्यांच्या मागे जंगलात पळत गेले परंतु आपण जंगलात त्यांच्या कचाट्यात सापडत आहोत हे त्यांच्या लक्षात आले नाही. बघता बघता १५० माओवाद्यांनी त्यांना घेरले आणि त्यांच्यावर जबरदस्त गोळीबार करून त्यातल्या १५ जणांना जिवानीशी मारले. 

या हल्ल्यात ४८ जवान सापडले होते. या हल्ल्याचे ठिकाण माओवाद्यांना चांगले माहीत होते. याच ठिकाणी हल्ला करणे त्यांच्या सोयीचे आहे याची पोलिसांना जाणीव होती. किंबहुना गतवर्षी झालेल्या या भागातल्या हल्ल्यामध्ये ही गोष्ट उघड झाली होती आणि तो भाग माओवाद्यांना अनुकूल असल्यामुळे कोणीतरी कॉंग्रेस पक्षाची शांतीयात्रा मार्ग बदलून या मार्गाने आणावयास भाग पाडले होते. ज्या भागात माओवादी यशस्वीरित्या हल्ला करू शकतात त्याच भागात पुन्हा एकदा पोलिसांनी त्यांच्या कचाट्यात सापडणे ही गोष्ट पोलीस दलाकडे डावपेच नाहीत हे स्पष्ट करणारी ठरते. गेल्या दहा-बारा दिवसांपासून हे जवान मजुरांचे संरक्षण करत आहेत. आपल्या मुक्कामाच्या ठिकाणापासून  रस्त्याच्या कामाच्या ठिकाणापर्यंत येण्याचा त्यांचा मार्ग हाच आहे आणि त्याच मार्गाने ते परत जात आहेत. ही गोष्ट माओवाद्यांच्या लक्षात आली. राखीव पोलिसांना माओवाद्यांचा सामना करायचा असेल तर आपल्या हालचालींचा अंदाज त्यांना येता कामा नये तत्व महत्त्वाचे असते. आपल्या हालचालीच्या जागा आणि मार्ग हे नेहमी बदलत ठेवले पाहिजेत. पण हा नियम पायदळी तुडवून राखीव पोलीस दल गेले काही दिवस याच मार्गाने येत आणि जात राहिले. परिणामी त्यांना घेराव करणे, माओवाद्यांना सोपे गेले. 

खरे म्हणजे अशात माओवाद्यांचा मोठा हल्ला होऊ शकतो. याची पूर्ण कल्पना त्यांना असायला हवी होती. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी या माओवाद्यांनीच जनतेला मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. परंतु ते आवाहन झुगारुन देऊन लोकांनी केवळ मतदानच केले असे नाही तर विक्रमी प्रमाणात मतदान केले. त्याची चीड माओवाद्यांच्या मनात होती. आपण विधानसभा निवडणुकीच्या काळात लोक मतदान करत असूनही एखादा मोठा हल्ला करू शकलो नाही याचे वैषम्य त्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी चिडून कालचा हा हल्ला केला. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा अभूतपूर्व बंदोबस्त केला जात होता. पुन्हा एकदा मतदानाच्या बहिष्काराचे आवाहन केले जात होते. पण हे आवाहन कोणी मानणार नाही हेही त्यांच्या लक्षात यायला लागले होते. आता आपण दहशत निर्माण केली नाही तर लोकसभेच्या निवडणुकीत सुध्दा विक्रमी मतदान होणार असे त्यांना वाटू लागले होते. त्यातूनच त्यांनी हा हल्ला केला. छत्तीसगड हे माओवादी चळवळीचे केन्द्र आहे. माओवाद्यांच्या हल्ल्यात २००९ पासून झारखंड आणि छत्तीसगड मध्ये सर्वाधिक लोकांचे या दहशतवाद्यांनी बळी घेतले आहेत. हा रक्तपात कधी संपणार आहे ?

Leave a Comment