राज ठाकरेंनी घेतली कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सुपारी

नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणे ही मनसेची भूमिका म्हणजे एक मुखवटा आहे. मराठी मतदारांना संभ्रमित करायचे, त्यांच्यात गोंधळ माजवून फूट पाडायची, अशी ही दुटप्पी भूमिका असून राज ठाकरे यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सुपारी घेतली आहे, असा स्पष्ट आरोप शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केला. यापूर्वी शिवसेनेने टाळीसाठी हात पुढे केला होता. पण राज ठाकरे यांनी प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या भूमिका घेतल्या. आता मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला व्हावा आणि मोदी पंतप्रधान होऊ नयेत यासाठीच राज यांनी खेळलेली ही चाल आहे. हे सुज्ञ मतदारांनी लक्षात घ्यावे, असेही त्या म्हणाल्या. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राज यांनी मोदींना पाठिंबा जाहीर केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीलाच त्याचा फायदा होईल असे म्हटले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांचेही तेच म्हणणे आहे.

राज ठाकरेंकडून मतदारांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न- भाजपची प्रतिक्रिया पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याच्या नावाखाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मतदारांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज ठाकरे यांच्या या भूमिकेचा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाच होईल, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप-रिपाइं- स्वाभिमानी शेतकरी संघटना- राष्ट्रीय समाज पक्षाची महायुती भक्कम असून आम्ही महाराष्ट्रातून महायुतीच्या 35 हून अधिक जागा जिंकू, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकसभेत मनसेचे निवडून आलेले उमेदवार पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. त्यानंतर तातडीने पत्रकार परिषद घेऊन तावडे यांनी याबाबत खुलासा केला. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे सामान्य मतदारांचा जर गोंधळ झाला तर मतविभाजन होऊन त्याचा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाच मिळेल असेही ते म्हणाले. मनसे-शेकाप-जनसुराज्य पक्ष अशी तिसरी आघाडी उभी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण त्यामुळेही आघाडी विरोधी मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा आघाडीलाच होईल असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, भाजप व शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी याबाबत सध्या तरी चुप्पी साधली आहे. नितीन गडकरी यांनी मोदींना समर्थन दिल्यामुळे राज यांचे आभार मानले आहेत तसेच एनडीएच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करावा असा पुन्हा एकदा सूर आवळला. शिवसेनेच्या वरिष्ठ वर्तुळातून मात्र याबाबत अदयाप प्रतिक्रिया आली नाही. कदाचित सध्या तरी सेना नेतृत्त्व शांत राहील तसेच मनसेच्या दुस-या यादीकडे लक्ष ठेवेल. त्यानंतरच सेना भूमिका घेईल असे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.राज यांच्या निर्णयाचा फटका महायुतीसह खुद्द भाजपलाही बसेल असे भाजपमधील नेत्यांनाही वाटत आहे. त्यामुळे गडकरींनी राज यांचे आभार मानण्याव्यतिरिक्त अधिक भाष्य केले नाही. मुंडे, फडणवीस हे राज यांच्या कृतीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच मनसेचे अधिकृत सर्व उमेदवार जाहीर झाल्यानंतरच याबाबत भाष्य करण्याचे ठरविले आहे. दरम्यान, सेनेने याबाबत जाहीर काहीही वक्तव्य करू नयेत, राज यांच्या निर्णयावर भाष्य करून याला महत्त्व देऊ नये असे मुंडे-फडणवीस जोडगळीने मातोश्रीवर निरोप पाठविला आहे.