फोर्ब्जने नुकत्याच जाहीर केलेल्या अब्जाधीशांच्या यादीत यंदा १७२ महिलांनी स्थान मिळविले असून गतवर्षीच्या तुलेनेत ही संख्या २५ टक्कयांनी वाढली आहे. जगभरातील १६४५ अब्जाधीशांमध्ये महिलांचा वाटा १० टक्के इतका आहे. या यादीत २६८ जणांना नव्याने स्थान मिळाले असून त्यात महिलांची संख्या आहे ४२. मात्र यातील केवळ ५ महिलाच स्वतःच्या कमाईवर या यादीत समाविष्ट झाल्या आहेत.
स्वकमाईवर या यादीत स्थान मिळविणार्यात फेसबुकची सीईओ शेरील सॅडबर्ग यांचा समावेश असून त्यांची संपत्ती आहे १.०५ अब्ज डॉलर्स. सर्वात युवा अब्जाधीश म्हणून चीनच्या परेना कोई या २४ वर्षीय युवतीने स्थान मिळविले आहे. तिची संपत्ती आहे १.३ अब्ज डॉलर्स. महिलांच्या यादीत प्रथम स्थानावर आहे वॉलमार्टची वारस ख्रिस्टी वाल्टन. तिची संपत्ती आहे ३६.७ अब्ज डॉलर्स. सॅम वॉल्टन या वॉलमार्टच्या संस्थापकाची ती सून असून ही संपत्ती तिला वारसा हक्काने मिळाली आहे.
दोन नंबरवर फ्रान्समधील लोरियाल या कॉस्मेटिक उत्पादकांची वारस लिलियन बेटनकोर्ट असून तिची संपत्ती आहे ३४.५ अब्ज डॉलर्स. तीन नंबरवर पुन्हा वॉलमार्टची वारस अॅलिस वाल्टन ही आहे.