हिटलरच्या माईन काम्फचा ४० लाख रूपयांत लिलाव

जर्मनीचा हुकुमशहा अॅडाल्फ हिटलर याच्या माईन काम्फ या आत्मचरित्राच्या दोन खंडातील प्रतींसाठी लिलावात ४० लाखांची बोली मिळाली असून ही खरेदी अज्ञात अमेरिकन नागरिकाने केली असल्याचे सँडर्स या ऑक्शनकर्त्याने जाहीर केले आहे. हे दोन्ही खंड १९२५-२६ सालात प्रकाशित केले गेले आहेत आणि त्यावर हिटलरची सही आहे. कापडी बांधणीचे हे खंड हिटलरने भेट म्हणून दिले होते.

हे खंड ऑनलाईन पद्धतीने विकले जाणार होते आणि त्यासाठी पहिली बोली २० हजार डॉलर्सची लागली होती. ११ जणांनी त्यानंतर आपली बोली लावली व अखेरी ते ६४,८५० डॉलर्सला विकले गेले. १९२३ साली सरकार अवैध मार्गाने पाडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हिटलरला तुरूंगवास झाला होता व त्या काळात त्याने हे पुस्तक लिहिले आहे. माईन काम्फ याचा अर्थ माझा संघर्ष.

या आत्मचरित्रात्मक पुस्तकातून हिटलरने ज्यू आणि कम्युनिस्टांवर टीका केली आहे. जर्मनीचा चान्सलर बनण्यापूर्वीच हे पुस्तक प्रकाशित झाले होते. लिलावकर्ता सँडर्स हा स्वतः ज्यू आहे तरीही तो म्हणतो, की या पुस्तकातील मते मान्य नसली तरी इतिहासाचा एक हिस्सा म्हणून त्याचे महत्त्व नाकारता येणार नाही.