२००५ पूर्वीच्या नोटा बदलण्यास मुदतवाढ

मुंबई – रिझर्व्ह बँकेने २००५ सालापूर्वीच्या नोटा चलनातून काढून घेण्यासाठी दिलेली मार्च २०१४ ची मुदत वाढविली असून आता या नोटा बाजारात १ जानेवारी २०१५ पर्यंत वापरता येणार आहेत. बनावट नोटांना आळा बसावा आणि काळा पैसा उजेडात यावा यासाठी ही उपाययोजना केली गेली होती.

या संदर्भात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की या नोटा चलनातून काढून घेण्याची शिफारस केंद्रीय अर्थमंत्रालयाने पूर्वीच केली होती ती आता लागू झाली आहे. २००५ नंतरच्या नोटांच्या मागच्या बाजूस छपाईचे साल छापले गेले आहे आणि त्याची नक्कल करणे सहजसाध्य नाही. त्यामुळे बनावट नोटा छापण्यास आळा बसणार आहे. त्याचा निवडणुकांशी कांहीही संबंध नाही. पूर्वीच्या आदेशानुसार ग्राहकांना या नोटा ३१ मार्च २०१४ पर्यंतच वापरता येणार होत्या व नंतर त्या बदलण्यासाठी बँकेकडेच जावे लागणार होते. आता या नोटा जानेवारी २०१५ पर्यंत बाजारात चालणार आहेत. नंतर त्या बँकांकडूनच बदलून घ्याव्या लागतील.