म. श्री. दीक्षित यांचे निधन

पुणे – पुण्याचा चालता-बोलता इतिहास असलेले लेखक-संपादक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर श्रीधर तथा म. श्री. दीक्षित (वय ८९) यांचे शनिवारी रात्री उशिरा हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पुत्र डॉ. राजा दीक्षित, सून मीनल, कन्या उषा, जावई तसेच नातवंडे व पतवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

दीक्षित यांचा जन्म १६ मे १९२४ रोजी झाला. सुरुवातीचे शिक्षण खेड, तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी नागपूर येथून पूर्ण केले. ज्येष्ठ लेखक श्री. म. माटे यांचे लेखनिक म्हणून त्यांनी काम केले. १९४७ पासून त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याला वाहून घेतले, तेव्हापासून सहा दशकांहून अधिक काळ ते मसपाशी निगडित राहिले.

संस्थेसाठी अनेक पदांवर कार्य करत त्यांनी योगदान दिले. मसापचा इतिहासही त्यांनी ग्रंथबद्ध केला. पुण्यातील साहित्यिक, सांस्कृतिक वर्तुळाशी ते जवळून संबंधित होते. पुण्याच्या गेल्या ७० वर्षांच्या इतिहासाचे ते सजग साक्षीदार होते.