मुंबई – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा झंझावात आणि त्याची वाढत चाललेली लोकप्रियता याचा कॉंग्रेसने चांगलचा धसका घेतला असून त्याला प्रत्युत्तर म्हणून स्टार प्रचारक राहुल गांधी यांचा देशव्यापी प्रचार दौरा आयोजित केला जात आहे. या दौर्याची आखणी अंतिम चरणात आहे. या दौर्याअंतर्गत राहुल गांधी महाराष्ट्रात दोन दिवस येणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार २८ फेब्रुवारीला राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत. या दिवशी ते राज्यातील विविध क्षेत्रातील नामवंताच्या भेटी घेऊन चर्चा करणार आहेत तर १ मार्चला मुंबईतील जनतेशी संवाद साधणार आहेत. यात त्यांचे रोड शोही केले जाणार आहेत आणि त्यात जनतेचा सहभाग असेल याची दक्षता घेतली जात आहे.
उत्तरपूर्व मुंबई मतदारसंघातून काँग्रेसचे मुंबई महासचिव गुरूदास कामत रिंगणात उतरत आहेत. त्यांच्या प्रचार मोहिमेची सुरवात महाराष्ट्राचे कॉग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्या हस्ते झाली तेव्हा मोहन प्रकाश यांनी राहुल गांधी यांचे रोड शो होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.