बारामती – आम आदमी पार्टीने देशातल्या प्रभावशाली उमेदवारांच्या विरोधात आपले उमेदवार उभे करण्याच्या मोहिमेत बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महिला उमेदवार उभी करण्याचा विचार सुरू केला आहे. २००९ च्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या कांता नलावडे या उभ्या होत्या.
कांता नलावडे यांचा सुप्रिया सुळे यांनी ३ लाख ३६ हजार मतांनी पराभव केला होता. कांता नलावडे यांना १ लाख ५० हजार मते मिळाली होती, तर सुप्रिया सुळे यांना ४ लाख ८६ हजार मते मिळाली होती. या मतदारसंघात मतदान कमी झाले होते, तरीही सुप्रिया सुळे यांना एवढे मताधिक्य मिळाले. बारामती मतदारसंघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा. विशेषत: पवार कुटुंबाचा बालेकिल्ला झाला आहे.
या मतदारसंघात पवार कुटुंबातल्या कोणाचाही पराभव करणे हे अशक्य मानले जात आहे. परंतु आम आदमी पार्टीने अंजली दमानिया यांना या मैदानात उतरवून पवारांची दमछाक करण्याची योजना आखायला सुरुवात केली आहे. अंजली दमानिया या निवडणुकीत उतरल्या नाहीत तर अन्य प्रभावी महिला उमेदवार कोण असावा यावर चर्चा सुरू असल्याचे पुणे जिल्हा आम आदमी पार्टीचे निमंत्रक मारुती भापकर यांनी सांगितले.