डीएनएवरून रोगनिदान

एखाद्या रुग्णाचा आजार नेमका कोणता आहे हे शोधून काढण्यासाठी काही लक्षणे पाहिली जातात. काही वेळा रक्त,लघवी यांच्या चाचणीतून रोगाचे निदान केले जाते. या सगळ्या रोग निदानाच्या प्रचलित पध्दती आहेत. परंतु अमेरिकेतल्या एका नवजात अर्भकाच्या आगळ्या वेगळ्या रोगनिदानातून त्याची नवीन पध्दत विकसीत झाली आहे. ती पध्दत म्हणजे रोग निदानासाठी डीएनएची चाचणी घेणे अमेरिकेतल्या मिसुरी प्रांतातील कॅन्सास सिटीमधील चिल्ड्रन्स् मर्सी हॉस्पिटल या बाल रुग्णालयातील डॉक्टरांनी ही नवी पध्दत शोधून काढली आहे. त्यांच्याकडे दाखल झालेला एका बालकाच्या उपचारा मध्ये त्यांना ही पध्दत सुचली. हे बाळ आजारी होते आणि त्याला सगळ्या प्रकारची औषधे देऊन झाली तरी त्याचा आजार काही कमी होत नव्हता. त्यामुळे डॉक्टरही उपचार करून थकले आणि बाळाचे पालकही निराश झाले. शेवटी आता हे बाळ मरण पावले तरी चालेल अशा निष्कर्षाप्रत सर्वजण आले.

मात्र एका डॉक्टरने या मुलांच्या रोगाचे निदान करण्यासाठी त्याची डीएनए चाचणी घ्यावी असा प्रस्ताव मांडला. ही चाचणी घेण्यात आली तेव्हा त्याच्या डीएनएमध्ये असे काही घटक आढळले की त्या घटकांमुळे त्याला अतीशय दुर्मिळ समजला जाणारा आजार झाला आहे. असा आजार सर्वसाधारणपणे लहान मुलांना होत नाही. हा प्रयोग ज्या रुग्णालयात केला जात होता त्या रुग्णालयाच्या २५ वर्षाच्या वाटचालीत हा विकार झालेला केवळ एक रुग्ण आलेला होता. आणि या विकाराचे निदान करण्याची कसलीही प्रचलित पध्दत उपलब्ध नव्हती. तेव्हा डीएनएची चाचणी करून लहान मुलांच्या आजाराचे निदान करता येते हे या चाचणीत दिसून आले.

काही लहान बालके जन्मतःच काही विकार घेऊन जन्माला येतात. त्यांच्यासाठी अशा पध्दतीने रोग निदान केले तर ते रक्त, लघवी, थुंकी अशा चाचणीपेक्षा अधिक प्रभावीपणे निदान होऊ शकेल असे या डॉक्टरांच्या लक्षात आले. या लहान मुलाला झालेला विकार अतिशय दुर्मिळ तर होताच पण त्यासाठी उपचारही उपलब्ध नव्हते त्यामुळे ते बाळ दगावले परंतु डॉक्टरांना या निदानातून रोग निदानाची नवी पध्दत सुचली. विज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे. त्यातून जनुकशास्त्र विकसित झाले आहे. त्या शास्त्राचा असा नीट उपयोग केला तर रोग निदान तर नेमकेपणाने होईलच पण योग्य ती औषध योजना करता येईल. तेव्हा प्रत्येक रुग्णाचे डीएनए मॅपिंग केले जावे म्हणजे त्याचा रोगही कळेल आणि औषधही नेमकेपणाने लागू होईल. कमी पैशात, कमी औषधात रुग्ण आजारातून बरा होऊ शकेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment