
भटिंडा: पंजाबमधील एका शेतकऱ्याने आपल्या लहानपणी पक्षांप्रमाणे आकाशात उडण्याचे स्वप्न रंगविले होते. शेती व्यवसायात स्थिर स्थावर झाल्यावर विमानांची प्रतिकृती तयार करण्याचा छंद जोपासत हे स्वप्न साकारण्याची कामगिरी केली आहे येथील एक शेतकरी यादविंदर सिंग खोखर यांनी!
छंदातून साकारले स्वप्न,पंजाबमधील एका शेतकऱ्याने बनविल्या विमानांच्या प्रतिकृती
खोखर हे भटिंडा जिल्ह्यातील सिरेवाला या गावात लहानाचे मोठे झाले. त्यांनी विज्ञानाची पदवी आणि संगणकशास्त्राची पदविका घेऊनही शेती करण्याचा पर्याय निवडला. कुटुंबातील एका विवाहासाठी सन २००७ मध्ये त्यांना ब्रिटनला जाण्याची संधी मिळाली. तिथे त्यांनी फ्लाईंग क्लबमध्ये वेगवेगळ्या विमानांच्या प्रतिकृती बघितल्या. त्यातून त्यांच्या लहानपणीच्या स्वप्नाला उजाळा मिळाला.
तिथून परत येताना खोखरा यांनी विमानाच्या दोन छोट्या प्रतिकृती बरोबर आणल्या. तेव्हापासून त्यांच्या मनात आपणही अशा प्रतिकृती तयार कराव्या, अशी उर्मी दाटून आली. त्यासाठी त्यांनी इंटरनेटवर शोध घेऊन एरोमॉडेलिंग या विषयाची माहिती घेतली. याच शोधात त्यांना दिल्ली येथे लष्कर आणि हवाई दलातील निवृत्त अधिकारी विमानांच्या प्रतिकृती बनविण्याचे प्रशिक्षण देत असल्याची माहिती मिळाली. खोखर यांनी हे प्रशिक्षण घेतले आणि स्वतः प्रतिकृती बनविण्यास सुरुवात केली.
खोखर यांनी आपल्या शेतात १ एकर जागेवर धावपट्टी उभारली. विमानांच्या प्रतिकृती बनविण्यासाठी प्रयोगशाळा आणि कार्यशाळाही उभारली. अधिक घनता असलेल्या थर्माकोलपासून विमानाच्या मोठ्या आकारातील प्रतिकृती ते बनवतात. ही विमाने धावपट्टीवरून आभाळात उड्डाण करतात आणि खऱ्या विमानाप्रमाणे जमिनीवर उतरतात. ही विमाने दूरवरून नियंत्रित करता येतात.
खोखर यांनी नुकतीच सी १३० हर्क्युलस या विमानाची प्रतिकृती बनवली आहे. देशात आतापर्यंत बनवली गेलेली ही आकाराने सर्वात मोठी प्रतिकृती आहे. गेल्या वर्षी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने या विक्रमाची नोंद घेतली आहेत. या शिवाय त्यांनी सुखोई या लढाऊ विमानासह अनेक विमानांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत. सध्या ते अँटोनोव या विमानाची प्रतिकृती बनवित आहेत.
आपले एरोमॉडेलिंगचे काम नागरी उड्डयन महासंचालनालय आणि अन्य संबंधित शासकीय नियमांप्रमाणे चालते. या प्रतिकृती नियमाने निश्चित केलेल्या उंचीवरच उड्डाण करतात, असे खोखर यांनी स्पष्ट केले.
चंदिगढ विद्यापीठ, महाराजा रणजीतसिंह तंत्र विद्यापीठ आणि भटिंडा व जीएनए विद्यापीठ यातील विद्यार्थ्यांना खोखर एरो मॉडेलिंगचे प्रशिक्षण देतात. एरोनॉटिक्सचे तंत्र आणि तत्व शिकविण्यासाठी विमानांच्या प्रतिकृती खूप उपयुक्त ठरतात, असा त्यांचा दावा आहे. या शिवाय आपल्या फार्महाऊसवर ते विद्यार्थ्यांसाठी एरोमॉडेलिंगच्या कार्यशाळा आयोजित करतात. त्यामध्ये विमानांची बांधणी आणि विविध भागांची कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन केले जाते.
खोखर यांच्या या अनोख्या आणि उपयुक्त छंदाची दखल घेऊन त्यांना अनेक सन्मान प्रदान करण्यात आले आहेत. विशेषत: अनेक विद्यापीठे आणि सैन्यदलाच्या विविध रेजिमेंट यांनी आपला गौरव केल्याचे ते नमूद करतात. आपल्या पित्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या धाकट्या मुलाने एरोनॉटिक्स विषयात अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे.
