दीपिका फिफा वर्ल्ड कप ट्रॉफीचे करणार अनावरण

कतार येथे सुरु असलेल्या फिफा वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना १८ डिसेंबर २०२२ रोजी होणार असून बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन यावेळी फिफा वर्ल्ड कप ट्रॉफीचे अनावरण करणार असल्याचे वृत्त आहे. दीपिका ग्लोबल आयकॉन आहे आणि बॉलीवूड प्रमाणे हॉलीवूड मध्येही तिने काम केले आहे. फिफा ट्रॉफी अनावरणाची जबाबदारी दीपिकावर सोपविली जाणे हा भारतीय कलाकाराला मिळालेला सन्मान असून फिफाच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली आहे.

दीपिका सध्या फायटर चित्रपटाचे शुटींग करत असून यात तिच्यासोबत ऋतिक रोशन आहे. हे दोघे प्रथमच एकत्र काम करत आहेत. दीपिका लवकरच कतार साठी रवाना होणार असल्याचे समजते. मात्र या बाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये भारतीय कलाकार नोरा फतेही हिने सुद्धा नृत्य केले आहे आणि त्याचे अनेक व्हीडीओ आले आहेत. यात नोराने भारतीय झेंडा हातात घेऊन नृत्य केले पण त्यासाठी तिला ट्रोल केले गेले. याचे कारण म्हणजे तिने राष्ट्रीय ध्वज उलट धरला होता.

दीपिका शाहरुखच्या पठाण मध्ये दिसणार आहे तसेच शाहरुखच्या जवान मध्ये सुद्धा तिची खास भूमिका आहे. या शिवाय प्रभास आणि दिशा पटनी समवेत प्रोजेक्ट के मध्ये दीपिका दिसेल.