मॉस्को: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे राष्ट्रभक्त नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने उल्लेखनीय प्रगती केली असून जगाच्या नकाशावर विकासाभिमुख देश म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, अशा शब्दात रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी मोदी यांची स्तुती केली आहे.
पुतीन यांच्याकडून मोदी यांची स्तुती
रशियाची थिंक tank समजल्या जाणाऱ्या संस्थेने आयोजित केलेल्या व्याख्यानात पुतिन यांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली.
मोदी यांच्या कार्यकाळात भारताने प्रगतीचा मोठा पल्ला गाठला आहे. ब्रिटिशांची वसाहत ते सर्वात मोठी लोकशाही, हा भारताचा प्रवास मनोहारी आहे. मोदी यांच्या ‘ मेक इन इंडिया ‘ या उपक्रमाने भारताला केवळ आर्थिक बळ मिळवून दिले नाही तर नैतिक धैर्य प्रप्ता करून दिले, असे पुतिन यांनी नमूद केले.
भारत आणि रशिया यांच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण नाते आहे. हे नाते दशकानुदशके कोणत्याही ताण अथवा वादाशिवाय टिकून आहे. कोणत्याही अटी शर्ती न घालता दोन्ही देश नि: स्वार्थपणे एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. हे नाते भविष्यातही टिकून राहील, अशी आशा पुतिन यांनी आपल्या व्याख्यानात व्यक्त केली.
भारतीय कृषी क्षेत्राला उभारी देण्यासाठी रशियाने खत पुरवठा वाढवावा, अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली होती. रशियाने भारताला दिल्या जाणाऱ्या खतांमध्ये तब्बल ७.६ पटीने वाढ केली आहे. त्यामुळे भारत आणि रशियाच्या कृषी व्यापारात दुपटीने वाढ झाली असून त्याचा भारतीय कृषी क्षेत्राला निश्चित लाभ होईल, असा विश्वास पुतिन यांनी व्यक्त केला.
पुतिन यांनी आपल्या व्याख्यानात पाश्चात्य राष्ट्रांवर कठोर टीका केली. स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी पाश्चात्य देश जगाशी ‘ डर्टी गेम ‘ खेळत असल्याचा आरोप पुतिन यांनी केला.
