लाहोर: टी २० विश्व चषक स्पर्धेतून पाकिस्तान संघ बाहेर पडणे हे संघ नेतृत्वाचे अपयश आहे. संघनायक म्हणून संघाचे नेतृत्व, धोरण निश्चिती आणि व्यवस्थापन करण्यात कर्णधार बाबर आझम अयशस्वी ठरला, अशी टीका पाकिस्तान क्रिकेट संघातील माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी केली आहे.
पाक संघनायक अपयशी: शोएब
झिम्बाब्वे संघाच्या समोर हार पत्करल्यानंतर शोएब यांनी आपल्या यू ट्युब चॅनेलवर पाक संघाच्या पराभवाचे विश्लेषण केले आहे. त्यात त्यांनी अपयशाचे खापर पाक संघ नेतृत्वावर, अर्थात बाबर आझम याच्या माथ्यावर फोडले आहे.
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान संघांमध्ये पर्ल येथील सामन्यात पाक संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे पाक संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यात जमा आहे. पाक संघ रविवारी नेदरलँड संघाचा सामना करणार आहे.
पाक संघाच्या फलंदाजांची सुरुवातीची आणि मधली फळी सक्षम आहे. सामना जिंकून देण्याची क्षमता या फलंदाज फळीमध्ये आहे. मात्र कप्तान म्हणून संघाच्या क्षमतांचा योग्य वापर करून डावपेच आखण्यात बाबर अपयशी ठरला, अशी टीका शोएब यांनी केली आहे.
विश्व चषक सामन्यात अटीतटीची परिस्थिती असताना पहिल्या फलंदाज बाद झाल्यावर बाबर याने मैदानात उतरणे अपेक्षित होते. मात्र, त्याने ते केले नाही, याकडे शोएब याने लक्ष वेधले. त्याने ज्या शाहीन शाह आफ्रिदी याला फलंदाजीला उतरवले, त्याच्या तंदुरुस्त असण्याबद्दल साशंकता होती. तुम्हाला संघाचे डावपेच आखता येत नाहीत. व्यवस्थापन करता येत नाही. मग समोरचा संघ चुका करेल आणि तुम्हाला विजय मिळवण्याची संधी देईल, असे तुम्ही समजता का, असा तिखट सवाल शोएब यांनी केला आहे.
