चित्रकुट पशुमेळ्यात १० कोटींचा, ‘गोलू २’ रेडा ठरलाय आकर्षण

उत्तर प्रदेश मधील चित्रकुट येथे भारतरत्न नानाजी देशमुख जयंती निमित्त दरवर्षी भरविल्या जाणाऱ्या ग्रामोदय पशु मेळ्यात १० कोटी रुपये किंमत असलेला गोलू २ हा रेडा गर्दीचे मुख्य आकर्षण बनला आहे. मेळ्याला भेट देणारे अनेकजण गोलू सोबत सेल्फी किंवा फोटो काढून घेण्यासाठी गर्दी करत आहेत. हरियाना येथील पशुपालक नरेंद्र सिंग यांच्या मालकीच्या गोलू २ रेड्याने आत्ता पर्यंत त्यांना सिरम विक्री म्हणजे वीर्य विक्रीतून २० लाख रुपयाची कमाई करून दिली आहे.

गोलू २ चे वय ४ वर्षे आणि ६ महिने आहे. तो पीसी ४८३ या रेड्यापासून झाला असून पीसी ४८३ देशभरात प्रसिद्ध आहे. नरेंद्र सिंग यांनीच हरियाना सरकारला पीसी ४८३ जनावराच्या जात सुधारणेसाठी भेट म्हणून दिला होता. नरेंद्र सिंग यांचे पशुपालन संदर्भात असलेले मोठे योगदान पाहून त्यांना पद्मश्री दिली गेली आहे.

गोलू २ साठी रोज ३२ किलो हिरवा आणि सुका चारा दिला जातो. त्याचबरोबर आठ किलो गहू, हरभरा आणि ६० ग्राम मिनरल मिश्रण असा आहार असून गोलू ला सध्या जगात तोड नाही असा दावा नरेंद्र सिंग करतात. त्यांनी सर्व शेतकरी बंधूनी चांगले वीर्य वापरून उत्तम दर्जाचे पशु तयार करावेत असे आवाहन केले आहे. ते म्हणाले महागाई पाहता पशुपालन सहज परवडणारे नाही. त्यामुळे पशुपालनातून चांगले उत्पन्न मिळवायचे असले तर चांगल्या दर्जाची जनावरे जन्माला आली पाहिजेत याची काळजी घ्यायला हवी.