शिंदे गटाची तुतारीला पसंती, तलवार, गदा अन्य पर्याय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट निवडणूक आयोगापुढे नवे निवडणूक चिन्ह आणि नवे पक्ष नाव दुपारी १ वाजेपर्यंत सादर करणार असून शिंदे गटाची पहिली पसंती ‘तुतारी’ला असल्याचे समजते. गदा आणि तलवार हे अन्य दोन पर्याय दिले जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. या संदर्भात रविवारी शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी सायंकाळी गटनेत्यांची बैठक झाली आणि त्यात हा निर्णय घेतला गेला असे समजते. पक्षाचे नाव ठरविताना बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे असे नाव जोडले जाऊ शकते असे संकेत दिले गेले आहेत. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह हंगामी स्वरुपात गोठविले असल्याने दोन्ही गटांना नवे चिन्ह आणि नवे नाव आयोगापुढे द्यावे लागणार आहे.

दरम्यान शिंदे गटाचे ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी एक व्हिडीओ मेसेज दिला आहे. त्यात मुंबई पोलिसांनी उद्धव गटाकडून बनावट प्रतिज्ञापत्रे आयोगापुढे सादर केली गेल्याची तक्रार दाखल करून घेतली असून त्या संदर्भात एफआयआर नोंदवून घेतला आहे. मस्के यांच्या म्हणण्यानुसार आयोगाने सदस्य संदर्भातील प्रतिज्ञापत्रे दाखल करण्याचे आदेश दोन्ही गटांना दिले होते, त्यानुसार उद्धव गटाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील ४६८२ प्रतिज्ञापत्रे फेक म्हणजे बनावट असल्याचे आणि हा गुन्हा असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली गेली होती. हा प्रकार ‘मातोश्री’च्या मार्गदर्शनाखालीच केला गेल्याचा आरोप मस्के यांनी केला आहे.