भारत जोडो यात्रेत राहुलच्या सोबत येणार प्रियांका वाड्रा

कॉंग्रेस तर्फे सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेचा आज १३ वा दिवस असून सध्या ही यात्रा केरळ मधून जात आहे. मंगळवारी कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी केरळच्या अलापुझ्झा येथे एक पत्रकार परिषद घेतली असून त्यात या यात्रेत राहुल गांधीच्या सोबत कॉंग्रेस महासचिव प्रियांका वाड्रा लवकरच सामील होत असल्याचे जाहीर केले आहे. आज यात्रेचा २८५ किमी चा टप्पा पूर्ण केला जाणार आहे. प्रियांका केरळ मधेच या यात्रेत सामील होतील असे सांगितले जात आहे.

७ सप्टेंबर पासून कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा कन्याकुमारी पासून सुरु झाली असून एकूण ३ हजार ५७० किमीचा प्रवास केला जाणार आहे. श्रीनगर मध्ये या यात्रेची सांगता होणार आहे. १२ राज्यातून जाणारी ही यात्रा एकूण १५० दिवस चालणार आहे. दरम्यान रमेश यांना कॉंग्रेस अध्यक्षपद निवडणुकी संदर्भात प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी, कुणीही कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक अर्ज भरू शकतो, त्यासाठी सोनिया गांधी यांच्या परवानगीची गरज नाही असे उत्तर दिले आहे.

राहुल यांच्या सोबत कॉंग्रेसचे अनेक बडे नेते या यात्रेत सामील झाले असून त्यांच्या निवाससाठी कंटेनरची सोय केली गेली आहे. दररोज साधारण १६ ते २३ किमीचा प्रवास पायी केला जाणार आहे.